सातारा प्रतिनिधी । दोन महिन्यापूर्वी खुनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सातारा येथील पांगारे गावच्या राहुल शिवाजी पवार (वय 30) या तरुणाचा शनिवारी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेत रविवारी दुपारी एक वाजता रुग्णवाहिकेतुन मृतदेहच सातारा पोलिस मुख्यालयासमोर आणला. त्यामुळे मुख्यालयासमोर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. फरारी असलेल्या 2 आरोपींना अटक करा, अशी आक्रमक मागणी करत ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजीही केल्यामुळे पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मृतदेह ठेवलेली रुग्णवाहिका ग्रामस्थांनी पांगारे गावच्या दिशेने नेली.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा तालुक्यामध्ये परळी खोऱ्यात पांगारे आणि राजापुरी ही दोन गावे आहेत. दि. 5 मे 2023 रोजी एका अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीवरून या ठिकाणी वाद झाला. राजापुरी गावातील सुमारे 30 ते 40 तरुणांच्या जमावाने मध्यरात्रीच्या सुमारास पांगारे गावात येऊन गावातील राहुल पवार आणि नयन पवार यांच्या घरावर हल्ला केला. राहुलला घराबाहेर बोलावून त्यांनी पोटात लाथा मारल्या. यामध्ये राहुल गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. राहुलवरती गेली दोन महिने रुग्णालयात उपचार सुरु होते.
याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी त्यावेळी आकाश आत्माराम मोरे, सुयोग जयसिंग गुरव, यश दीपक निकम, गजानन आनंदराव मोरे, तुषार शंकर साळुंखे, गणेश तात्याबा मोरे, जगदीश शंकर साळुंखे, प्रथमेश भाऊसो साळुंखे, प्रतीक सतीश साळुंखे, गणेश युवराज मोरे, संकल्प संजय साळुंखे, आविष्कार संजय साळुंखे (सर्व रा. राजापुरी, ता. सातारा) यांना अटक केली आहे. मात्र, यातील आणखी काही जणांना अटक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
त्या प्रतिसाद दिल्यानंतर शनिवारी दुपारी राहुलचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच संपूर्ण पांगारे गावातील ग्रामस्थांनी पुणे येथे धाव घेतली. राहुलला मारहाण करणाऱ्यांवर पोलिसांकडून काहीच कारवाई केली जात नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी राहुलचा मृतदेह घेऊन थेट साताऱ्याच्या दिशेने आले. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास राहुलचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घेऊन ग्रामस्थ सातारा येथील पोलिस मुख्यालयासमोर दाखल झाले. या ठिकाणी पांगारे ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेत राहुलवर हल्ला करणाऱ्यांमध्ये पोलिस व राजकारण्यांची मुले आहेत.
त्यांनाही या गुन्ह्यात सहआरोपी करावे, अशी मागणी केली. यावेळी सातारा शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी जमावाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांचा जमावाने आक्रमक होत आरोपींना अटक झाल्याशिवाय या ठिकाणाहून जाणार नसल्याची भूमिका घेतली. ग्रामस्थांना शांत करत पोलिस निरीक्षक शहा आणि फडतरे यांनी संयमाने कायदेशीर प्रक्रिया ग्रामस्थांना समजावून सांगितली.
या प्रकरणात जी नावे समोर येतील, त्यातील कोणाचीही गय केली जाणार नाही, असे लेखी आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले. अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी राहुलचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका पांगारेकडे नेली. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.