सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा आणि आर्टस, कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेज, नागठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, 24 जानेवारी रोजी नागठाणे येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात सातारा जिल्ह्यातील उमेदवारांना विविध क्षेत्रातील नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व नोकरी इच्छुक उमेदवारांना या मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले आहे. या मेळाव्यात डिप्लोमा इंजिनिअर, कॉम्प्युटर ऑपरेटर, ग्रांईडर, फिटर, इलेक्ट्रिशियन, मशनिस्ट, टर्नर, १० वी पास / नापास, आय टी आय, कुशल/अर्धकुशल कामगार अशा प्रकारची १ हजार ४७ रिक्तपदे भरली जाणार आहेत.
उमेदवारांना https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत, ज्यामुळे त्यांना थेट नोकरी मिळवण्याची संधी मिळेल.