कराड प्रतिनिधी | महाराष्ट्रात काल राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करत पक्षातील बंडखोर आमदारांविरोधात एल्गार पुकारला. पवार यांना पाठींबा देण्यासाठी इतर कार्यकर्त्याप्रमाणे पवार साहेबांवर प्रेम करणारे पंढरपूर येथील 70 वर्षाचे कट्टर कार्यकर्ते दत्तात्रय बडवे कराड येथे आले होते. त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. यावेळी त्यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी संवाद साधत आपण शरद पवार साहेबांसोबत आहोत. साक्षात पंढरपूरच्या विठूरायाचा आशीर्वाद पवार साहेबांसोबत असताना त्यांना कुणाची भीती नाही. आम्ही यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी अभिवादन करून त्यांनी पवार साहेबांना लढण्यासाठी बळ द्या, असे साकडे घातल्याचे बडवे यांनी सांगितले.
आज खा. शरद पवार यांच्या स्वागतासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर वरून कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगमावरील समाधी स्थळी दाखल झाले होते. यावेळी पंढरपूरचे कार्यकर्ते बडवे यांच्यासोबत पंढरपूरहून संतोष ताटे हे कराडला आले होते. यावेळी बडवे म्हणाले की, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस व खासदार शरद पवार यांच्यासोबत आहोत. पवार साहेबांवर आज कठीण प्रसंग आलेला आहे.
पवार साहेबांनी ज्यांच्यासाठी आपले आयुष्य खर्ची केले. त्यांना अनेक पदे दिली. त्या घरातील त्यांच्या लोकांनी साहेबांशी गद्दारी केली. अशांना कोणीही माफ करणार नाही. आम्ही साहेबांच्यासाठी थेट पंढरपूरहून कराडला आलो आहोत. आम्ही काहीही झालं तरी साहेबांच्या बरोबर आहोत. कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी सोमवारी पहाटेपासून शरद पवार यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी समर्थक कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली. तसेच कराड शहरात ठिकठिकाणी त्यांच्या समर्थनाचे फ्लेक्स लागल्याचे दिसून आले.