सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर, पाचगणी परिसर ओळखला जातो. येथील पाचगणी परिसरातील निसर्ग श्रावणात चांगलाच हिरवाईने नटला असून पाचगणीच्या टेबल लँड पठारावर पांढर्याशुभ्र गेंद फुलांनी पठार फुलले आहे.
सातारा जिल्ह्यातील कास पठारानंतर पाचगणी भिलार परिसरात फ्लॉवर व्हॅली नव्याने उदयास येऊ लागली आहे. पाचगणी परिसरातील रस्तेदेखील मिकी माऊस लव्हेंडर व पांढर्याशुभ्र विविध रंगीबेरंगी फुलांनी दुतर्फा सजले आहेत. सध्या रंगीबेरंगी फुलांची कास फ्लॉवर व्हॅली नुकतीच सुरू झाली आहे. मात्र, पाचगणीत पिवळ्या शुभ्र फुलांनी परिसरातील सर्वच पठार बहरला आहे.
श्रावणात पाचगणी भिलार परिसरातील निसर्ग व या परिसरातील पर्वतरांगा रंगीबेरंगी रानफुलांनी व हिरव्यागार गवतांच्या गालिचांनी बहरून जातात. निसर्गाची अद्भुत लीला या ठिकाणी वर्षानुवर्षे पाहावयास मिळते. उंच पर्वतरांगा, त्यामधून हिरव्यागार गवतांचे गालिचातून रंगीबेरंगी फुले डोकावू लागतात. येणार्या पर्यटकांना आपल्या सौंदर्याकडे पाहण्यासाठी आकर्षित करत आहेत. पाचगणी, भिलार व महाबळेश्वरचा निसर्ग सध्या चांगलाच बहरला आहे. वास्तविक, पाचगणी महाबळेश्वरचे पर्यटन पावसाळ्यातदेखील चांगलेच बहरून आले होते. केवळ उन्हाळ्यातच पाचगणी महाबळेश्वरला पर्यटक न येता आता बारा महिने या निसर्गरम्य पर्यटनस्थळी पर्यटक हजारोच्या संख्येने भेट देत असतात.
सध्या पाचगणी येथील पांगारी, भिलार, कासवंड टेबल लँड, सिडनी पॉईंट, पारसी पॉईंट हा परिसर हिरव्यागार निसर्गाने फुलला आहे. येणारा प्रत्येक पर्यटक या हिरव्यागार निसर्गाचा फोटो व्हिडीओ टिपल्याशिवाय आपल्या घरी जात नाही. पांगरीतून धोम धरणाचा अथांग निळा जलसागर पाहिल्यानंतर ‘मन उधाण झाले रे’ ही प्रचिती येते. शहरातील संजीवन विद्यालय मैदानाचे पठार त्याचबरोबर अंजुमन इस्लाम पठार भिलारचे पठार हे सर्व रंगीबेरंगी फुलांनी बहरले आहे.