सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहराचे मुख्य प्रवेशव्दार राज्य महामार्ग क्र १३९ लगत दांडेघर नाक्याचे रस्ता रुंदीकरणाचे कामामध्ये अडथळा ठरणारी हॉटेल बेसिलिका लगत अतिक्रमण केलेले कंपौन्ड वॉल पालिकेने जेसीबीच्या साहाय्याने शुक्रवारी पाडली.
कारवाई नगरपालिकेचे अतिक्रमण पथकाने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशान्वये वाई उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, महाबळेश्वर तहसिलदार तेजस्विनी पाटील, मुख्याधिकारी तथा प्रशासक निखील जाधव, सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार आणि पोलिस कर्मचारी यांचे उपस्थितीमध्ये दुपारी करण्यात आली.
जेव्हा ही अतिक्रमण हटावची कारवाई करण्यात आली तेव्हा मिळकतधारक आणि पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर सामोपचाराने मिळकतधारक यांनी उर्वरित अतिक्रमण हे ३ दिवसांचे आत स्व:खर्चाने काढून घेत असलेचे आश्वासित केले आहे. त्यानंतर अतिक्रमण मोहीम थांबविण्यात आली.
अतिक्रमण केलेली कंपौन्डवॉल काढल्यानंतर रस्तारुंदीकरणाच्या कामांमुळे पाचगणी महाबळेश्वर येथे येणा-या पर्यटकांना तसेच स्थानिक नागरीकांना वाहतुकीचा भेडसावणारा प्रश्न निकालात निघणार असून वाहतूक नियंत्रण यंत्रणा सुरळीत होणेस मदत होणार आहे. असे यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक निखील जाधव यांच्या वतीने सांगण्यात आले.