सातारा प्रतिनिधी । पाचगणी शहरातील प्रत्येक घटकाला एका छताखाली घेऊन भूमिपुत्रांना व्यवसायाची संधी, पर्यटनाला चालना आणि गिरीस्थानांचा लौकिक वाढवण्यासाठी होणाऱ्या पाचगणी फेस्टिव्हलची धूम यंदा ता. २९ नोव्हेंबरपासून तीन दिवस सर्वांना अनुभवता येणार आहे. दरम्यान, यासंदर्भातील प्रस्ताव आणि स्मरणिका नुकतीच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना सादर करण्यात आली. त्या वेळी श्री. डुडी यांनी या आयोजनाचे कौतुक करत, या सोहळ्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही फेस्टिव्हल समितीच्या शिष्टमंडळास दिली.
शहरी भागातील जनजीवन हे पर्यटन आणि निवासी शाळांवर अवलंबून आहे,. तर ग्रामीण परिसरातील जनजीवन शेतीवर अवलंबून आहे. गरुडझेप घेतलेल्या जॅम, जेली व तत्सम पदार्थांच्या व्यवसायाने अनेकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध झाले. त्यापुढे येथील पर्यटनाला चालना मिळावी, स्थानिकांना व्यवसायाची संधी मिळावी, तसेच शहराचा लौकिक वाढवा यासाठी शहरातील नागरिक, अगदी छोट्या व्यावसायिकापासून ते शाळाप्रमुख, नगरपालिका, पोलिस यंत्रणा व इतर शासकीय यंत्रणा, हॉटेल व्यावसायिक, घोडगाडीवाले, रोटरी क्लब, रोटरॅक्ट क्लब, सार्वजनिक मंडळे हातात हात घालून एकत्र येण्याची संकल्पना सात वर्षांपूर्वी रुजली आणि त्यातून आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल उदयास आला.
तेव्हापासून राज्यातील, परराज्यातील पर्यटकांबरोबरच परदेशी पाहुणे, विविध शाळांतील माजी विद्यार्थी या आनंद सोहळ्यात चिंब होण्यास हजेरी लावत आहेत. विविध कलाविष्कारांची मेजवानी घेऊन येणाऱ्या या सोहळ्याला गेल्या वर्षी राज्य शासनाच्या पर्यटन कार्यक्रमाच्या श्रृंखलेत स्थान मिळाल्याने या फेस्टिव्हलला एक उंची प्राप्त झाली. फेस्टिव्हल कमिटीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, शाहराम जवानमर्दी, सुनील कांबळे, किरण पवार, सुनील बगाडे व अमित भिलारे या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डुडी यांना भेटून यावर्षीचा प्रस्ताव, आराखडा व स्मरणिका सादर केली.