सातारा प्रतिनिधी | काही सरकारी कार्यालयांकडे वीजबिलाची थकबाकी वाढली आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील प्रामुख्याने पोलीस विभाग व जिल्हा परिषदेच्या ७३६५ विविध कार्यालयांच्या वीजबिलांची थकबाकी तब्बल २१ कोटी ४० लाख रुपयांवर गेली आहे. वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती खडतर होत आहे. सातारा जिल्ह्यातील सरकरी कार्यालयांकडे २ कोटी ११ लाख इतकी वीजबिल थकबाकी आहे.
पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडून मासिक वीजबिलांचा भरणा होत नसल्याने थकबाकीमध्ये वाढ होत आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम सुरु केली आहे. या सोबतच वीजबिलांची सर्वाधिक थकबाकी असलेल्या सरकारी कार्यालयांची यादी देखील तयार करण्यात आली आहे. थकीत रकमेचा भरणा झाला नाही तर प्रसंगी वीजपुरवठा खंडित करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यातील १,३९३ सरकारी कार्यालयांच्या वीजबिलांची थकबाकी २ कोटी ११ लाख इतकी आहे. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या १२८५ कार्यालयांची १ कोटी ९७ लाख आणि जिल्हा पोलीस विभागाच्या १०८ कार्यालयांची थकबाकी १३ लाख रूपये आहे. वीजबिल भरण्यासाठी सर्व सरकारी कार्यालयांच्या वार्षिक अंदाजपत्रकामध्ये निधीची तरतूद केली जाते व त्याप्रमाणे संबंधित खात्याकडून निधी उपलब्ध होतो. मात्र, वीजबिलांचा नियमित भरणा होत नसल्याने थकबाकी वाढत गेली आहे.