सातारा प्रतिनिधी । सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हामुळे पंखे, एसी तसेच हिटर असे साहित्य वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, वीज वापरून त्याचा वीज भरणा वेळेवर करण्यात आलेला नसल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात थकबाकीदारांमध्ये वाढ झाली आहे. अशात थकीत वीजदेयक हप्त्यांनी भरण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना आता महावितरणकडून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना आपल्या वीज बिलांची थकबाकी एकरकमीच भरावी लागणार आहे. ३१ मार्चपूर्वी थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचे कनेक्शन महावितरणकडून खंडित केले जाणार आहे.
कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांना देखील याचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे महावितरणकडून कोरोना कालावधीत बोजदेयक हप्त्यानी भरण्याची सुविधा सुरु करण्यात आली होती. कृषी वगळता अन्य प्रवर्गातीलतील लघुदाब ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येत होता. मात्र, आता हि योजना महावितरणकडून बंद करण्यात आली असून आता ग्राहकांना चालू बिल अथवा थकबाकी एकरकमी जमा करावी लागणार आहे.
थकबाकी वसुलीसाठी महावितरणकडून ठोस पावले उचलण्यात आली असून थकबाकीदारांचे बीज कनेक्शन खंडित केले जात आहे. नागरिकांनी ३१ मार्चपूर्वी वीज बिल भरून कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे
जिल्ह्यात थकबाकीदारांना नोटिसा
शेती वगळता अन्य वर्गवारीतील थकबाकीदार वीज ग्राहकांची संख्या १ लाख ६२ हजार १०३ आहे. या ग्राहकांकडे तब्बल १५८ कोटी ५४ लाख इतकी थकबाकी आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी गत महिनाभराचा कालावधी आहे. थकबाकीदार ग्राहकांना मार्च अखेरपर्यंत थकीत वीज बिल भरवि लागणार आहे. महावितरणकडून थकबाकीदारांना वीज बिल भरण्यावाचत नोटीस बजावली जात आहे. वारंवार नोटीस बजावूनही थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचे वीज कनेक्शन खंडित केले जात आहे.
अशी आहे 5 तालुक्यातील थकबाकीची आकडेवारी
1) कराड तालुक्यात 47,977 थकबाकीदार असून 40 कोटी 47 लाख थकबाकी आहे.
2) फलटण तालुक्यात 32,167 थकबाकीदार असून 46 कोटी 77 लाख थकबाकी आहे.
3) सातारा तालुक्यात 35,836 थकबाकीदार असून 31 कोटी 26 लाख थकबाकी आहे.
4) वडूज मध्ये 29,464 थकबाकीदार असून 30 कोटी 20 लाख थकबाकी आहे.
5) वाई तालुक्यात 16,651 थकबाकीदार असून 9 कोटी 14 लाख थकबाकी आहे.