कोरेगावच्या उत्तर भागात लम्पीचा प्रादुर्भाव; आजारी जनावरांमुळे दूध उत्पादनात घट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यात जनावरांना लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असून, या आजारामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे. पसरणी परिसरात तीन दिवसांपूर्वी एक लम्पी आजाराने त्रस्त असणारी गाय आढळले. तर कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागात लंपीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पशुधन मालकांत भीतीचे वातावरण आहे.

शेतीला जोडधंदा म्हणून या भागात मोठ्या प्रमाणात पशुपालन केले जाते. त्यामुळे शेतकरी कुटुंबांना आर्थिक हातभार मिळतो. गृहिणीच्या मदतीमुळे हा व्यवसाय घरोघरी पोचला असून, घर तिथे गोठा असे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळू लागले होते. मात्र, कोरोना काळापासून हे चित्र पालटू लागले आहे. संकटे शेतकऱ्यांची पाठ सोडायचे नाव घेत नाहीत. पिंपोडे बुद्रुक, वाघोली, वाठार स्टेशन, येळेवस्ती, रणदुल्लाबाद व परिसरात गेल्या पंधरवड्यात लम्पी बाधित जनावरे सापडली आहेत.

येळेवस्तीवरील एक गाय दगावली आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक दूध उत्पादकांनी जागा बदलून जनावरे गावाबाहेर शेतात ठेवली आहेत.

जनावरांना लम्पी प्रतिबंधक लस देण्याचे काम सुरू आहे. मात्र, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे या कामाला वेग नाही. त्यामुळे खासगी डॉक्टरांकडून उपचार घ्यावे लागत आहेत. मात्र, लसीकरण झाले असले तरीहीलम्पीचा प्रसार वेगाने होत आहे. राज्य सरकारने या आजारावर मोफत उपचार केले जात असल्याचे म्हटले जाते आहे.

लंपी आजाराची लक्षणे

गायी, म्हशींना हा आजार होतो. मात्र, शेळ्यांमध्ये हा आजार पाहायला मिळालेला नाही. यात जनावरांना हलका ताप येतो. शरीरावर गाठी तयार होतात. तोंडातून लाळ अधिक प्रमाणात पडू लागते. डोळे आणि नाकातून पाणी येऊ लागते. जनावरांच्या पायांना सूज येते. दुधाचे प्रमाणही कमी होते. वंध्यत्व, गर्भपात, न्यूमोनिया, पांगळेपणाचा त्रास सहन करावा लागतो. लम्पी हा विषाणूजन्य त्वचा आजार आहे. त्याला लम्पी स्कीन व्हायरस म्हणतात. त्याचे तीन प्रकार आहेत. पहिला कॅप्रिपोक्सव्हायरस, दुसरा गोटपॉक्स व्हायरस आणि तिसरा मेंढीपॉक्स व्हायरस असे तीन प्रकार आहेत. डास आणि माशा या रक्त पिणाऱ्या कीटकांमुळे हा आजार पसरतो.

लंम्पीबाबत पशुधन पालकांनी दक्षता घ्यावी : डॉ. बोर्डे

दवाखान्यात जाऊन जनावरांवर उपचार करून घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर दूषित पाणी आणि चाऱ्यामुळे हा संसर्ग जनावरांना होतो. कोणत्याही प्राण्याला हा आजार झाल्याचे समजताच त्याला इतर प्राण्यांपासून स्वतंत्र ठेवावे. त्याचे पाणी आणि चारा इतर जनावरांना देऊ नये. ज्या ठिकाणी जनावरे ठेवतात ती जागा स्वच्छ राखावी, असे आवाहन केले असल्याची माहिती पशू संवर्धन उपयुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.