सातारा प्रतिनिधी | फलटण शहर आणि तालुक्यात डेंग्यू, गोचीड ताप, चिकुनगुनिया या साथीच्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. प्रशासनाने व आरोग्य विभागाने संयुक्तपणे साथरोग नियंत्रित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. दरम्यान, नगरपालिकेचे स्वच्छतेकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याने साथरोग वाढत आहेत.
जून महिन्यांपासून झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी तुंबलेली गटारे, साठलेले पाणी, न उचललेला कचरा, खड्डेमय रस्त्यावर साचत असलेले पाणी यामुळे शहर व तालुक्यात डासांची उत्पत्ती वाढली आहे. साथ रोग फैलावत आहेत. परिणामी शासकीय व खासगी रुग्णालयात डेंग्यू, गोचीड ताप, चिकुन गुनिया वगैरे साथ रोगांची रुग्ण संख्या गल्लोगल्लीत वाढत आहे. आरोग्य विभाग व खासगी रुग्णालयातून रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. उपचार खर्चाने सामान्य बेजार झाले आहेत. शासकीय आरोग्य यंत्रणांनी अधिक प्रभावीपणे उपाययोजना राबवण्याची गरज आहे.
फलटण शहर व परिसरात खाजगी रुग्णालयात डेंग्यूचे जुलैमध्ये 24, ऑगस्टमध्ये 55, सप्टेंबरमध्ये आतापर्यंत 32 असे एकूण 111 रुग्ण आढळून आले. शासकीय रुग्णालयात जुलैमध्ये 1 आणि ऑगस्टमध्ये 1 असे केवळ 2 रुग्ण आढळून आले. गोचीड तापाचे ऑगस्टमध्ये 2 आणि सप्टेंबरमध्ये 2 असे 4 रुग्ण आढळून आले आहेत.
फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रा. आरोग्य केंद्र आणि खासगी रुग्णालय येथे एकूण डेंग्यूचे 104 आणि शहरात 33 असे एकूण 137 रुग्ण आढळले असून त्यापैकी 128 खाजगी रुग्णालयात आणि 9 प्रा. आरोग्य केंद्रात उपचार घेणारे आहेत. या 137 डेंग्यू रुग्णांपैकी 116 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून 21 रुग्ण उपचार घेत आहेत. प्रा. आरोग्य केंद्रात उपचार घेणार्या 9 डेंग्यू रुग्णांपैकी गिरवी प्रा. आरोग्य केंद्र 2, तरडगाव प्रा. आरोग्य केंद्र 4 आणि फलटण येथे 3 डेंग्यू रुग्ण आढळले तर खाजगी रुग्णालयात बरड 6, बिबी 10, गिरवी 28, साखरवाडी 20, फलटण 30, ताथवडा 4, राजाळे 20, तरडगाव 10 असे खासगी रुग्णालयात 128 रुग्ण गेल्या 13 दिवसात दाखल झाले आहेत.