सातारा प्रतिनिधी | किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाचा वध झालेल्या ठिकाणी शिवप्रतापाचे शिल्प राज्य सरकारकडून लवकरच उभारले जाणार आहे. या शिल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आता हे शिल्प आचारसंहिता लागण्यापूर्वीच उभे करण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.
माजी आमदार नितीन शिंदे यांनी मुंबईतील सह्याद्री अथितीगृहामध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नुकतीच भेट घेतली. तसेच मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करत त्यांना निवेदन दिले. यावेळी झालेल्या बैठकीत नितीन शिंदे म्हणाले की, शिल्पकार दीपक थोपटे, पर्यटन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे हे भव्य शिल्प बसविण्याच्या कामात अधिकचा वेळ लागत आहे. तरी हा समन्वय साधावा. शिल्प उभारण्यासाठी लागणारा चौथरा तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पूर्ण करून घ्यावा तसेच जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकार दीपक थोपटे यांचेकडून शिल्पदेखील लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यात यावे.
शिल्प बसविण्याच्या कामामध्ये आचारसंहितेची अडचण येऊ नये, त्यामुळे विधानसभा निवडणुकीचीआचारसंहिता लागण्यापूर्वी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवप्रतापाचे भव्य शिल्प उभे करावे, अशी मागणी शिंदे यांनी मुनगंटीवार यांच्याकडे केली. दरम्यान, नितीन शिंदे यांनी सहकाऱ्यांसह पुण्यातील नन्हे एम.आय.डी.सी. येथे शिल्पकार दीपक थोपटे यांच्या कारखान्यात जाऊन शिल्पाची पाहणी केली आणि शिल्प लवकरात लवकर पूर्ण करावे, अशा सूचना शिल्पकार थोपटे यांना केल्या. यानंतर मंत्री मुनगंटीवार व विशेष कार्यअधिकारी अमोल जाधव यांनी संबंधित सर्व यंत्रणांशी संपर्क साधून आचारसंहिता लागण्यापूर्वी शिवप्रतापाचे शिल्प प्रतापगडाचे पायथ्याशी बसवावे, असे आदेश देण्यात आले आहेत.