पीडित महिलांच्या तक्रारींचा होणार निपटारा; साताऱ्यात 27 जूनला ‘महिला आयोग आपल्या दारी’चे आयोजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । महिलांच्या तक्रारीबाबत स्थानिक पातळीवर आपले म्हणणे मांडण्याकरिता “महिला आयोग आपल्या दारी” उपक्रमाद्वारे सातारा जिल्हयातील महिलांच्या तक्रारीची स्थानिक स्तरावर सोडवणूक केली जाणार आहे. गुरुवार दि. 27 जून रोजी सकाळी १० वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत जनसुनावणी आयोजित केलेली आहे, अशी माहिती महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे यांनी दिली आहे.

साताऱ्यात होणाऱ्या या सुनावणीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन व पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित राहणार आहेत. या जनसुनावणीमध्ये ५ स्वतंत्र पॅनल्स तयार करण्यात येणार असून प्रत्येक पॅनलमध्ये सदस्य म्हणून विधी व न्याय प्राधिकरणाचे वकील, संरक्षण अधिकारी, पोलीस अधिकारी, समुपदेशक, महिला व मुलांचे सहाय्य कक्ष, पोलीस अधिकारी, सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी यांचे समावेश करण्यात आलेला आहे.

पॅनल्सद्वारे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे विभागीय कार्यालयातील पुणे येथे सातारा जिल्ह्याच्या प्राप्त तक्रारी व इतर सेवाभावी संस्थेचे समुपदेशन केंद्र यांचेकडील प्रकरणांचे तसेच ऐनवेळी येणाऱ्या पीडित महिलांचे तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे. सातारा येथे होणाऱ्या महिला जनसुनावणीस पीडित, समस्या व तक्रारी असणाऱ्या जास्तीत जास्त महिलांनी सदर सुनावणीत सहभाग घेऊन आपल्या समस्या मांडाव्यात असे आवाहन श्री. तावरे यांनी केले आहे.