कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील कुसूर येथील श्री. स. गा. म. विद्यालय व पांडुरंग देसाई अध्यापक विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने दिवंगत दानशूर बंडो गोपाळा कदम उर्फ मुकादम तात्या यांच्या जयंतीनिमित्त विविध पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीचा ४३ वा मुकादम साहित्य पुरस्कार हा डॉ. सुरेश व्यंकटराव ढमढेरे यांनी लिहिलेल्या ‘माझा जीवन प्रवास’ या आत्मचरित्र ग्रंथास दिला जाणार असल्याची माहिती माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
श्री स. गा. म. विद्यालयाच्या सभागृहात मुकादम तात्या यांच्या १२३ व्या जयंतीच्या कार्यक्रमात उद्या दि. २९ जानेवारी २०२४ रोजी रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव बी. एन. पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी इतिहास संशोधक, व्याख्याने डॉ. श्रीमंत – शिवाजी कोकाटे, रयत शिक्षण संस्थेचे मेंनेजिंग कौन्सिल सदस्य अॅड. रवींद्र पवार, सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, पुणे येथील – राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. जे. पी. देसाई व रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विभागाचे विभागीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी १.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम ५ हजार रुपये असे साहित्य पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी ‘उपरा’कार लक्ष्मण माने, सिंधुताई सपकाळ, नरेद्र जाधव, शंकरराव खरात, विश्वास पाटील, डॉ. राजन गवस, डॉ. श्रीपाल सबनीस, उत्तम कांबळे, नागनाथ कोतापल्ले, डॉ. आर. ए. कुंभार, प्राचार्य विजय नलावडे, श्रीकांत पाटील हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
यावर्षीचा प्राचार्य ए. डी. अत्तार आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. दशरथ बाबुराव जाधव (छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा) याना तर चैतन्य पुरस्कार इंग्लिश स्कूल पाडळी-निनाम येथील उपशिक्षक उपेंद्र बसतराव घाडगे यांना प्रदान करण्यात येणार आहे. मुकादम तात्या यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी पुरस्कार वितरण आयोजित केला जातो. पुरस्कार वितरण समारंभास परिसरातील विद्यार्थी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने पत्रकात करण्यात आले आहे.