सातारा विभागातील 24 बसस्थानकातील होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करा; नियोजन महाव्यवस्थापकांचे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । मुंबईतील घाटकोपर येथील महाकाय होर्डिंग्ज कोसळून १६ जण मृत्युमुखी पडले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महानगर पालिका आणि पालिकांनी शहरातील होर्डिंग्जधारकांना स्ट्रक्चरल ऑडिट करून ते सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने देखील सहभाग घेतला असून सातारा विभागातील सर्व बसस्थानकातील होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश महामंडळाच्या नियोजन व पणन महाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकाला दिले आहेत. त्यानुसार धोकादायक होर्डिंग्ज तातडीने काढण्याच्या सूचना जिल्ह्यातील २४ बसस्थानकांना करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागात एकूण २४ बसस्थानके येतात. त्यामध्ये सातारा, काशिळ, अतित, कराड, पाटण, ढेबेवाडी, वाई, भुईंज, पाचवड, महाबळेश्वर, पाचगणी, पारगाव खंडाळा, शिरवळ, लोणंद, फलटण, कोरेगाव, रहिमतपूर, वाठार स्टेशन, वडूज, औंध, दहिवडी, म्हसवड, शिंगणापूर, मेढा या बसस्थानकांचा समावेश आहे. या बसस्थानकाच्या आवारात मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज उभारण्यात आली आहेत. ही होर्डिंग्ज उंच असल्याने या होर्डिंग्जचे आतापर्यंत स्ट्रक्चरल ऑडीट झाले नसल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे महामंडळाने घाटकोपर येथील घटनेची पुनरावृत्ती महामंडळाच्या बसस्थानकात होऊ नये यासाठी पुण्याच्या खासगी कंपनीमार्फत सातारा जिल्ह्यातील सर्व बसस्थानकातील होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित कंपनीमार्फत बसस्थानकातील होर्डिंग्जची आजची स्थिती तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. धोकादायक स्थितीतील होर्डिंग्ज तातडीने काढून टाकण्याचे आदेशही महामंडळाच्या नियोजन व पणन महाव्यवस्थापकांनी दिले आहेत.