गणेशोत्सव विशेष । मित्रानो, सध्या सर्वत्र गणेशोत्सव सुरु असून जनतेमध्ये अत्यंत उत्साहाने आणि आनंदाचे वातावरण आहे. प्रामुख्याने १० दिवस गणपतीची स्थापना करून ११ व्या दिवशी आपण गणेश विसर्ज करतो. काही ठिकाणी ५ तर काही ठिकाणी दीड दिवसाचा गणपती बसवला जातो. कराड येथील डुबल घराण्यात सुद्धा वर्षानुवर्षे दीड दिवसाचा गणपती बसवला जातो आणि वाजतगाजत गणेशाचे विसर्जनही केले जाते. परंतु यामागे खूप मोठा इतिहास आहे आणि त्याचा संबध थेट युद्धाशी आहे. होय, वाचून नवल वाटलं ना? पण हे खरं आहे. चला तर मग याबाबत जाणून घेऊया.
आधी जाणून घेऊया डुबल वाड्याबद्दल
कराड येथे कृष्णा- कोयना प्रितिसंगमाच्या जवळच भुईकोट किल्ला आहे. हा किल्ला शहरापेक्षा जास्त उंचीवर आहे. किल्ल्याच्या दक्षिणेस डुबल इनामदार यांच्या वाड्याचे बांधकाम केलेले आहे. किल्ला व वाडा यांच्यामध्ये खोल खंदक आहे. वाड्याची उंची शहराच्या पातळीपेक्षा उंच आहे. हा वाडा सुमारे ३०० फुट भरावावर बांधलेचे दिसते. वाड्याच्या पुर्वेस शिंपी, न्हावी, तेली वगैरे बलुतेदारांची वस्ती आहे. उत्तरेस बाह्मणवस्ती, दक्षिणेस शिंदे, जाधव, शिंगण, पोळ इ. मराठा शेतकऱ्याची वस्ती आहे.डुबल वाड्याला चारी बाजूंनी तटबंदी होती. या तटबंदीत चार बुरुज होते. वाड्यामध्ये प्रवेश करण्यासाठी दक्षिण बाजूला दाभोळवेस व उत्तर बाजूला रंगारवेस, अशा दोन वेशींतून व्यवस्था केलेली होती. डुबल घराण्याचे वंशज आजही या परिसरात वास्तव्य करत आहेत. गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या वंशजांनी डुबल वाड्याचा देखावा केला आहे. तसेच आपण दरवर्षी दीड दिवसात गणपती विसर्जन का करतो यामागचा इतिहास सांगितला आहे.
कराड येथील डुबल घराण्यात बसतो फक्त दीड दिवसाचा गणपती; थेट युद्धाशी आहे संबंध pic.twitter.com/ikWtkeOUOQ
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) September 22, 2023
… म्हणून दीड दिवसात गणपती विसर्जन केलं जातं-
याबाबत विजयकुमार डुबल यांनी सांगितलं कि, डुबल घराण्यातील सर्व गणपती दीड दिवसात विसर्जित केले जातात. 265 वर्षांपूर्वी डुबल घराण्यातील माणसे हे युद्धावर गेले होते. त्यावेळी सर्वत्र गणेशोत्सव होता. त्यामुळे युद्धावर जाताना गणपती विसर्जन दीड दिवसांत करूनच ते युद्धावर गेले होते. तेव्हापासून आजपर्यंत ही परंपरा जोपासली गेली आहे. त्यामुळे कराड येथील सर्व डुबल घरे दीड दिवसांत गणपतीचे विसर्जन करतात. गंणेशोत्सव निमित्तानं आम्ही डुबल वाड्याच्या प्रतिकृतीच्या देखावाच घरी केला आहे अशी माहितीही विजयकुमार डुबल यांनी दिली.
कराडच्या सरदार डुबल घराण्याचा इतिहास-
स्वराज्य रक्षणासाठी दक्षिण महाराष्ट्रातील ज्या सरदार घराण्यांनी मोलाचे योगदान दिले, त्यामध्ये कराडच्या साळोखे-डुबल घराण्याचा अग्रकमाने आहे. साताराच्या छत्रपती शाहू महाराजांचे आप्त असणाऱया या घराण्यातील व्यक्तींनी प्रसंगीप्राणांची आहूती देऊन स्वराज्यरक्षण केले आहे. हे घराणे पहिल्यांचा कराड येथे स्थायिक झाले. त्यानंतर या घराण्यातीलव्यक्तींनी आपल्या कर्तृत्त्वाने विविध अधिकारपदे मिळवली. कराड पेठेचे महाजनपद, कराड प्रांताचे देशचौगुले वतन, मिरजेच्या भुईकोट किल्ल्याचे किल्लेदारपद, सांगली संस्थानचे सरंजामदार अशा अनेक पदावर डुबल घराण्यातील व्यक्ती कार्यरत होत्या. आजही हे घराणे राजकारण, समाजकारणात कार्यरत आहे.
साभार : युवराज म्हस्के, कराड
9822951554