सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती करताना विविध संकटांचा सामना करावा लागतो. त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पीक विमा योजना सुरु करण्यात आली असून एक रुपया भरून सहभाग घेता येत आहे. यावर्षीही खरीप हंगामातील विमा उतरविण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत असून आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. अजूनही दोन दिवस शिल्लक राहिले आहेत.
पिक विम्याअंतर्गत नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना बाजरीसाठी १८ तर कांद्याला हेक्टरी ४६ हजारांपर्यंत मदत मिळवता येणार आहे. शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे पीक उत्पादनालाही फटका बसतो. यासाठी पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पावसातील खंड, ढगफुटी, चक्रीवादळ आदी कारणाने पिकाचे नुकसान झाल्यास विमा उतरविलेल्या पिकांसाठी भरपाई देण्यात येते. यासाठी पूर्वी शेतकऱ्यांना ठराविक रक्कम भरावी लागत होती. तर राज्य आणि केंद्र शासनाचाही वाटा असायचा; पण राज्य शासनाने गेल्यावर्षीच्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना एक रुपयांत पीक विमा देण्याचा निर्णय घेतला आहे.
यावर्षीही एक रुपयात पीक विमा देण्याची योजना सुरू आहे. या योजनेत बिगर कर्जदार शेतकरीही सहभागी होऊ शकतात. जिल्ह्यात गेल्यावर्षी या योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. सुमारे पावणे तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी विमा काढला होता. यामध्ये माण तालुक्यातील सर्वाधिक शेतकरी सहभागी झाले होते. त्यातच गेल्यावर्षी दुष्काळ पडल्याने लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यास मदत झाली.