सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी यावर्षी उन्हाळी पिक घेण्याचे प्रमाण कमी झाले असून सुमारे दीड हजार हेक्टरवरच शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. जिल्ह्यात केवळ ३२.३० टक्के इतकेच प्रमाण आहे.
सातारा जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी हे दोन हंगाम महत्त्वाचे समजले जातात. यातील खरीप हा सर्वांत मोठा हंगाम असतो. सुमारे ३ लाख हेक्टर क्षेत्र राहते. तर रब्बीत २ लाख हेक्टरवर पेरणी केली जाते. जून महिन्यात मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर खरीप हंगामात पेरणीची गडबड सुरू राहते. या मान्सूनवर शेतकऱ्यांचे वर्षभराचे पिकांचे गणित अवलंबून असते. पर्जन्यमान चांगले झाले तर खरीप आणि रब्बी हंगामही पदरी पडतो. तसेच उन्हाळी हंगामातही शेतकरी पिके घेतो.
मात्र, गेल्यावर्षी जिल्ह्यातच अपुरे पर्जन्यमान झाले आणि याचा फटका खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना बसला परिणामी उत्पादन कमी झाले. त्यातच दुष्काळी परिस्थितीही निर्माण झाली. यामुळे जिल्ह्यातील उन्हाळी हंगामावर परिणाम झाला. सर्वसाधारण क्षेत्र ४ हजार ८६० हेक्टर निश्चित करण्यात आले होते. यामध्ये उन्हाळी भुईमूग, मका, सूर्यफूल, सोयाबीन ही पिके शेतकरी घेतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, भुईमूग, मका, सोयाबीन पिके घेण्यात आली.
जिल्ह्यात प्रत्यक्षात भुईमूगाची ११२४ हेक्टरवर पेरणी
सातारा जिल्ह्यात पाऊस पडला नसला तरी उन्हाळ्यात २ हजार ६९९ 3 हेक्टरवर भुईमूग घेण्यात येईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, प्रत्यक्षात १ हजार १२४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. ४१.६७ टक्के पेरणीचे प्रमाण आहे. तर मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र २ हजार ७४ हेक्टर होते. तर पेरणी ४१३ हेक्टरवर झाली. सुमारे २० टक्के क्षेत्रावरच मका पिकाची पेरणी झालेली आहे. सातारा तालुक्यात ३७२ हेक्टर उन्हाळी पिकाचे क्षेत्र होते; पण पेरणी १४१ हेक्टरवरच झालेली आहे. तसेच जावळीत ३२ हेक्टर, पाटण २०६ हेक्टर, कराड तालुक्यात ९३, कोरेगाव ६४, खटाव ४५३, माण ४८ हेक्टर, खंडाळा ९३, फलटण १०३ आणि वाई तालुक्यात ३४ हेक्टरवर उन्हाळी पिके घेण्यात आलेली आहेत.