कांद्याच्या दर वाढीचा तडका; मिसळ, भाजीतून आता विसरा; किरकोळ बाजारात 80 रुपये किलो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सध्या महागाईचे प्रमाण चांगलेच वाढू लागले आहे. गॅस सिलेंडरच्या दरवाढीपासून सुरुवात झाली असून भाजीपाला पाठोपाठ आता कांद्याने देखील सर्वांचा वांदा केल्याचे दिसत आहे. स्वयंपाकघरातील अविभाज्य घटक असलेला कांदा आता महागला आहे. कांद्याच्या दरात वाढ झाली असून कांद्याने थेट शंभरीच्या उंबरठ्यावर आला आहे. या आठवड्यात कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे स्वयंपाकघरातून कांद्याचे प्रमाण कमी होण्याची चिन्हे आहेत. कांद्याने सध्या चांगलीच उसळी घेतली आहे. किरकोळ बाजारात ७० ते ८० रुपये किलोपर्यंत दर गेला आहे. विशेष म्हणजे जुना कांदा बघायला मिळत नसल्याने नवीन कांद्यानेच भाव खाल्ला आहे. कांद्याने उसळी घेतल्याने मिसळसह भाजीतून कांदा गायब झाला आहे.

कांदाभजी, मिसळपाव यासारखे चटपटीत पदार्थ महागण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात कांद्याची लागवड चांगली होती. पण काढणीवेळी झालेल्या परतीच्या पावसाने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. चाळीतील कांदा बाजारात येत होता, त्यावेळी कांद्याचे दर स्थिर होते पण, जुना कांदा संपला आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार नवीन काद्यांचा पुरवठा होत नसल्याने दर कडाडले आहेत.

कराड शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या कांद्याची आवक कमी झाली आहे. आज मंगळवारी कराड बाजार समितीमध्ये कांद्याच्या ३०० पिशव्यांची आवक झाली असून ३० ते ४० रुपये प्रति किलो इतका दर आहे. मात्र, हाच दर प्रत्यक्ष बाजारात ७० ते ८० रुपये पार्टी किलो असा आहे. घाऊक बाजारातच चांगल्या प्रतीचा कांदा प्रतिकिलो ६० ते ८० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. भाजीपाल्याच्या दरातही वाढ झाली असून हिवाळ्यात भाजीपाल्याच्या दरात घसरण होते, पण आवक कमी असल्याने दर तेजीत आहेत. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे दरवाढीचे प्रमाण वाढणार आहे.

दरवाढीमुळे कांदा लागला रडवू

जिल्ह्यात पावसाळा संपून हिवाळी ऋतू सुरू झाला आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला असून भाज्यांचे दरही कडाडले आहेत. तसेच कांदाही रडवू लागला आहे. तर पावटा आणि वाटाणा परवडेना अशी स्थिती झालेली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. शहरातील मंडई असो किंवा गावांचे आठवडी बाजार भाज्यांच्या दरवाढ झाल्याचे दिसत आहे.

संक्रांतीपर्यंत तेजी राहणार

एप्रिल-मे महिन्यात कांद्याचे दर एकदम कमी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, सध्या तेजी असून, संक्रांतीपर्यंत असे दर कायम राहतील. असे व्यापाऱ्याऱ्यांचे म्हणणे आहे. उन्हाळ्यात नुकसान सहन करायला लागलेल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा कालावधी चांगला आहे.

हॉटेल पदार्थ महागणार?

शहरासह ग्रामीण भागातील आठवडी बाजारासह भाजी मंडईत कांद्याचा भाव वधारला आहे. यामुळे कांदा खरेदीत गृहिणी आखडता हात घेऊ लागल्या आहेत. दुसरीकडे घाऊक बाजारात कांद्याच्या दराची चढती कमान राहिल्याने किरकोळ खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांपासून हॉटेल व्यावसायिकांनी कांद्याचा समावेश असलेल्या पदार्थांचे तूर्तास दर वाढवले आहेत. काही ठिकाणी तर ताटात कांद्याऐवजी ग्राहकांना कोबी देण्यात येत आहे.

गोबी मंच्युरियनला मागणी वाढली…

शहरातील विविध ठिकाणी गोबी मंच्युरियन हातगाड्यांवर, बेकरीमध्ये मिळते. गेल्या काही दिवसांपासून सामान्य नागरिकांचा गोबी मंच्युरियन खाण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे. कांदा भजी देखील कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. कांद्याच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांनी गोबी मंच्युरियनकडे आपला मोर्चा वळविला आहे. गोबी मंच्युरियनबरोबर युवा वर्गात सँडविचला काही प्रमाणात मागणी वाढली आहे. सँडविचमध्ये कांदा सोडून काकडी, कोबीसह टोमॅटोचा समावेश असतो.

कांद्याच्या दरवाढीचा भजीपासून ऑम्लेटवर परिणाम

कांद्याच्या वाढत्या भावामुळे शहरातील विविध हॉटेलमध्ये कांदा भजी, मिसळ, पावभाजी यासह हातगाडीवर किरकोळ खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांनी भेळ, ऑम्लेट या पदार्थांमध्ये कांदा टाकण्याचे प्रमाण कमी केले आहे. काही ठिकाणी या पदार्थ्यांच्या भावात काहीशी वाढ करण्यात आली आहे. ढाब्यांवर तर ग्राहकांना कांदा कमी प्रमाणात दिला जात आहे.

बाजारपेठेतील असे आहेत भाजीचे दर प्रति किलो

पावटा : १२० रुपये प्रति किलो
गवारी : १४० रुपये प्रति किलो
भेंडी : ८० रुपये प्रति किलो
हिरवी मिरची : ५० रुपये प्रति किलो
ढब्बू मिरची : ७० रुपये प्रति किलो
कांदा : ८० रुपये प्रति किलो
लसूण : ४०० रुपये प्रति किलो
बटाटे : ५० रुपये प्रति किलो
टोमॅटो : ४० रुपये प्रति किलो
बीट : १२० रुपये प्रति किलो
कोबी : ४० रुपये प्रति किलो
पालक पेंढी : २० रुपये प्रति किलो
वांगी : ८० रुपये प्रति किलो
प्लॉवर : ८० रुपये प्रति किलो