सातारा प्रतिनिधी | सातारा तालुक्यातील देगाव येथील पाझर तलावात सोमवारी सायंकाळी पोहण्यासाठी देगाव येथील ३९ वर्षीय व्यक्ती गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे.
मंगेश गोविंद साळुंखे, असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मगेश साळुंखे हा पाझर तलावात पोहण्यासाठी गेला होता. पोहताना त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. यामुळे तो बुडू लागला. त्याने मदतीसाठी आवाज दिला. परंतु त्याला मदत मिळू शकली नाही. त्यामुळे तो पाण्यात बुडाला. याची माहिती स्थानिकांनी तालुका पोलिसांना दिली.
पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. नंतर महाबळेश्वर ट्रेकर्स व प्रतापगज सर्च आणि रेस्क्यू टिमचे सदस्य सुनिल बाबा भाटिया, सूर्यकांत शिंदे, दीपक ओंबळे, अनिकेत वागदरे हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले. अवघ्या अर्धा तासात त्यांना मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठवला. या घटनेची नोंद तालुका पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत