कराड प्रतिनिधी । कराड शहरात शाहू चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर व बेशिस्त वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी महत्वाचा मार्ग काढला आहे. याठिकाणी एकेरी वाहतुकीचा पर्याय निवडला आहे. या चौकात बॅरिगेड्स उभे करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लागण्याबरोबरच कोंडी टाळली जात आहे.
कराड शहरात कोल्हापूर नाक्यावरून तसेच जुन्या कोयना पुलावरून कहऱ्हाडात येणारी वाहने त्याचबरोबर दत्त चौकातून कोल्हापूर नाक्याकडे जाणारी वाहने शाहू चौकातून मार्गस्थ होतात. या ठिकाणी कोल्हापूर नाक्याकडे जाणारी वाहने सरळ मार्गाने निघून जातात. मात्र, जुन्या पुलाकडे जाणारी वाहने रस्ता ओलांडून पलीकडे येत असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत होती.
त्यातच सकाळी तसेच सायंकाळच्या वेळीरहदारी वाढल्यानंतर या ठिकाणी हमखास वाहनांच्या रांगा लागत होत्या. भरधाव वाहनांमुळे काहीवेळा अपघातही घडत होते. या चौकातील रस्ता प्रशस्त असतानाही केवळ वाहनधारकांच्या बेशिस्तपणामुळे कोंडीची तसेच अपघाताची गंभीर समस्या निर्माण झाली होती. शाहू चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्याबाबत वाहतूक पोलिसांकडून पालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
मात्र, त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. असे असताना पोलिसांनी शाहू चौकातील बेशिस्त वाहतूक रोखून वाहतुकीला शिस्त लावण्याबरोबरच कोंडी टाळण्यासाठी एकेरी वाहतुकीचा पर्याय निवडला आहे. या ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी बॅरिगेडस उभे करण्यात आले असून कहऱ्हाडात येणारी व बाहेर जाणारी वाहने एकेरी मार्गाने करण्यात आली आहेत.