सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हयातील वाई येथील हरिहरेश्वर बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी खंडाळा शाखेचा प्रमुखाला पोलिसांनी नुकतीच अटक केली. रणजित शिर्के (रा. यशवंतनगर, वाई) असे पोलिसांनी वाई बसस्थानकातून अटक केलेल्या नाव आहे. त्याला शुक्रवार, दि. 12 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश वाई न्यायालयाने दिला आहे.
याबाबत माहिती अशी, वाई तालुक्यातील हरिहरेश्वर बँकेतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात 2021 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी लेखापरीक्षकांनी बँकेचे संचालक मंडळ आणि अधिकार्यांवर सभासद, खातेदारांच्या फसवणुकीचा ठपका ठेवला होता. या गुन्ह्यातील एक संशयित रणजित शिर्के हा खंडाळा शाखेचा प्रमुख म्हणून काम करत होता.
शिर्के हा शनिवारी (दि. 6) रोजी वाई बसस्थानकात येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तेथे सापळा रचला होता. अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी सातारा येथून विशेष पथक पाठवले होते. शिर्के हा वाईत आल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान, या प्रकरणातील संशयितांची धरपकड पोलिसांनी सुरू केल्याने, काहींचे धाबे दणाणले आहेत. अनेक संशयित पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी नातेवाईकांकडे राहत असल्याची चर्चा आहे.