कराड प्रतिनिधी | सासुशी असलेल्या जुन्या भांडणाचे कारणावरून व पत्नी हिचे बरोबर असलेल्या वादावरून मेहुणा रणजित उर्फ निरंजन (वय ७ वर्षे ) याच्यावर असलेल्या रागातून त्याचा आगाशिवनगर, दांगटवस्ती येथील डोंगरातील दगडी पायऱ्यांवर आपटून खून केल्याच्या खटल्यात दोषी धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश आण्णासाहेब पाटील यांनी आरोपी सागर शंकर जाधव यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
याबाबत अधिक माहिती शी की, दि. १०/०८/२०१९ रोजी सदर मयत मुलगा रणजित उर्फ निरंजन याची आई कामावरून संध्याकाळी ५ वाजता आली. त्यावेळी मुलगा रणजित उर्फ निरंजन हा जवळच राहत असलेल्या थोरली बहिण सोनाली हिच्या दारात मुलांबरोबर खेळत होता. त्यानंतर सुमारे ६ च्या सुमारास तो संडासला जावुन येवून पुन्हा तिथेच खेळायला गेला. त्यावेळी ७ च्या सुमारास त्याची आई फिर्यादी अनिता मुकेश पवार ही त्यास बोलावण्यास गेली असता तो तिथे दिसला नाही. म्हणून तिने सगळीकडे वस्तीमध्ये हाका मारून त्याची चौकशी केली असता व सर्वांनी जावई म्हणजे आरोपी यास त्याबाबत विचारले असता त्याने काही सांगितले नाही. त्यानंतर त्याचा फिर्यादी व इतर लोक शोध घेतच होते.
त्यावेळी फिर्यादीची मुलगी म्हणजे आरोपीची बायको सौ. सोनाली ही रात्री ०९.३० च्या सुमारास कामावरून आली व तीही शोध घेणेस मदत करू लागली. त्यावेळी तिचेसह सर्वांनी पुन्हा आरोपी यास मुलाबद्दल विचारले असता त्याने मयत रणजित हा भिंतीजवळ लपून बसला आहे का ते पाहुया असे म्हणून फिर्यादीचा पती मुकेश व शेजारी राहणारा एक इसम यास घेवुन आरोपी सदर भिंतीजवळ गेला. त्याने त्याठिकाणी जखमी अवस्थेत पडलेला मुलगा दाखविला.
त्यास घेवून ते वस्तीत आले व कृष्णा हॉस्पीटल येथे घेवून गेले असता तो मयत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यावरून त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. म्हणून त्याबाबत पोलीसांच्याकडे तकार दिली असता त्यांनी आरोपीच्या गुन्हेगारी कृत्यानंतरच्या वर्तवणूकीचा अभ्यास करून त्यास ताब्यात घेतले व त्याची याबाबत सखोल चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा आरोपीने केलेचा निष्कर्ष काढून त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल केलेले होते.
यामध्ये सदर मयत मुलगा हा मयत होणेपुर्वी आरोपी बरोबर संडासकडे जाताना ३ ते ४ जणांनी त्यांना प्रत्यक्ष पाहिले होते. त्यामुळे सदर प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षी याकामी महत्वपुर्ण ठरल्या. तसेच याकामी परिस्थितीजन्य पुरावा हा अत्यंत महत्वाचा ठरला. त्यामुळे कराड शहर पो ठाणे ता. कराड जि. सातारा अंतर्गत गु.र.न. ५६५ / २०१९ भा. द. वि. सं. कलम ३०२ कलमांन्वये आरोपी सागर शंकर जाधव याचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये सरकार पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील श्री. मिलिंद व्ही. कुलकर्णी यांनी एकूण ११ साक्षीदार तपासले आहेत. यातील फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, व तपासी अंमलदार श्री. ए. एल. शिरोळे पोलीस उप निरीक्षक, कराड पो. स्टे यांचे साक्षी महत्वाचा धरून आरोपी विरूध्द भक्कम पुराव्या आधारे गुन्हा शाबीत झाल्याने आरोपीस न्यायालयाने शिक्षा दिली आहे.
सदरच्या खटल्यात सरकारी वकील श्री. मिलिंद व्ही. कुलकर्णी यांचा युक्तीवाद ग्राहय धरून मे. कोर्टात गुन्हा शाबीत झाल्याने आरोपीस मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश, मा. आण्णासाहेब नि. पाटील, साो, यांनी दोषी धरून आरोपी सागर शंकर जाधव यास भा. द. वि. सं. कलम. ३०२ कलमांनुसार आजन्म कारावास व र. रूपये १,०००/- रूपयाची द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास ६ महिने करावास, अशी शिक्षा सुनावली.