मद्यधुंद चालकाने ट्रकला दिली जोरदार धडक; एकजण गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । रात्रीच्यावेळी मद्यपिऊन गाडी चालवणाऱ्यांचे प्रमाण भलतेच वाढले आहे. यामुळे अपघाताच्या देखील घटना घडत आहेत. अशीच एक अपघाताची घटना खटाव तालुक्यातील वडी या गावानजीक घडली. येथील पुलाचे काम सुरू असल्याने सुमारे १०० मिटरवर सलग डबल स्पीड ब्रेकर करण्यात आलेले आहेत. या स्पीड ब्रेकरवरून मंगळवारी रात्री ट्रकला एका दूध वाहतूक करणाऱ्या गाडीने पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, खटाव तालुक्यातील वडी गावच्या हद्दीत आयशर कंपनीच्या क्रमांक MH 12 PQ 3486 हा ट्रक स्पीड ब्रेकर वर असतानाच गोविंद डेअरीचे दुध व दुग्धजन्य पदार्थ डिलिव्हरी करणाऱ्या आयशर कंपनीच्या MH 11 DD 5364 मधील मनोज मोहन गायकवाड या मद्यधुंद चालकाने मागच्या बाजूला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात क्लिनर बाजूस बसलेला सुपरवायझर गंभीर जखमी झाला.

या अपघाताची माहिती औंध पोलीस ठाण्यातील पेट्रोलिंग करत असलेले पोलीस अधिकारी पंकज भुजबळ आणि गृहरक्षक दलाचे जवान यांना मिळाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघाताची माहिती घेतली. तसेच पेट्रोलिंग करत असलेल्या पोलीस वाहनातून औंध रूग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये पाठविले. या अपघाताचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे यांच्याकडून केला जात आहे.