पुणे-बंगळुरू महामार्गावर मलकापूरच्या हद्दीत कार मालट्रक अपघातात एकजण ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | पुणे-बंगळुरू महामार्गाकडेला उभ्या मालट्रकला भरधाव कारची पाठीमागून धडक होऊन झालेल्या अपघातात कार ट्रकखाली घुसली. या अपघातात कारमधील एकजण जागीच ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना पुणे- बंगळुरू महामार्गावर मलकापूर हद्दीत बुधवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर कराड -कोल्हापूर लेनवरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.

विष्णू दत्तू सुतार (वय ५५, रा. पिंपळगाव बुद्रुक ता. कागल, जि. कोल्हापूर) असे अपघातात जागीच ठार झालेल्याचे नाव आहे. तर चालक अभिजित शिवाजी मुळे (रा. पिंपळगाव खुर्द ता. कागल जि. कोल्हापूर) असे अपघातात जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मालट्रक (एमएच १३ डी क्यू ९६४६) नाधव) हा माल भरून कोल्हापूर दिशेला जात होता. पुणे-बंगळूरू महामार्गावरमलकापूर येथे झाडाखालचा वडापाव दुकानासमोर आला असता पंक्चर झाला. चालकाने पंक्चर काढण्यासाठी मालट्रक महामार्गाकडेला उभा केला होता. पंक्चर काढत असताना पाठीमागून जागी मालट्रकला काहीतरी धडकल्याचा आवाज आला. चालकाने पाठीमागे जाऊन बघितले असता, कार (जीए ०५ डी ८५७७) मालट्रकखाली घुसली होती.

या अपघातात सुतार याच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. मुळे गंभीर जखमी झाले. मुळे आणि त्यांचे कर्मचारी सुतार हे दोघे कामानिमित्त पेण येथे गेले होते. काम आटोपून परत गावी जात असताना कारवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला, अशी चर्चा अपघातस्थळी होती. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. अपघातस्थळी बघ्यांची गर्दी झाल्यामुळे पुणे-कोल्हापूर लेनवरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती महामार्ग देखभाल विभागासह कराड पोलिस स्टेशन व महामार्ग पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच देखभाल विभागाचे कर्मचारी व पोलिस तातडीने अपघातस्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवून दिले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वेणुताई उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. कदम क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.