पाईपलाइन फोडण्याच्या वादातून आर्वीत एकावर कोयत्याने वार

0
720
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव तालुक्यातील आर्वी येथील बटकी शिवारात पाइपलाइन फोडण्याच्या वादातून एकावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली. या प्रकरणी रहिमतपूर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, की मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास विलास सुरेश एटने यास अमोल एटने, बजरंग एटने (रा. आर्वी) आणि त्यांच्या आई यांनी शेतात बोलावून घेऊन पाइपलाइन फोडण्याच्या कारणावरून वाद सुरू केला. या वादातून अमोल एटने याने ऊसतोडीच्या कोयत्याने विलास एटने यांच्या मानेवर वार केला. त्यानंतर दुसरा वार करत असताना विलास एटने यांनी तो हाताने अडवण्याचा प्रयत्न केला; परंतु यामध्ये त्यांचा डावा अंगठा तुटून शेतात पडला. त्यांनी आरडाओरडा करताच त्यांच्या कुटुंबीयांनी धाव घेतली आणि तातडीने त्यांना सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

दरम्यान, अमोल मोहन एटने यांनी फिर्याद दिली, की त्याच बटकी शिवारात शंकर एटने, दत्तात्रय एटने आणि विलास एटने (सर्व रा. आर्वी) यांनी एकत्र येऊन संगनमताने त्यांच्यावर हल्ला केला, तसेच शेतातील पाइप का फोडला, असे म्हणत शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केली. या घटनेप्रकरणी रहिमतपूर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास हवालदार भुजबळ व घाडगे करत आहेत.