कराड नगरपालिकेच्या जलतरण तलावात बुडून एकाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड नगरपरिषदेच्या वतीने शहर तसेच परिसरात राहणाऱ्या नागरिकांना पोहण्यासाठी जलतरण तलाव बांधण्यात आला आहे. कृष्णा नाक्याशेजारी असणाऱ्या या जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. शेखर दुंडाप्पा कोले (वय ४२, मूळ रा. उत्तूर, ता. आजरा, जि. कोल्हापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जलतरण तलावात मृत्यू झालेले शेखर कोले हे कराडमधील सायकल व्यावसायिक संजय बटाणे यांचे जावई आहेत. मुंबई (जोगेश्वरी) येथे ते नोकरीस होते. ते संजय बटाणे यांच्या घरी येत-जा करत होते. दरम्यान, कराड येथे आल्यानंतर ते कराड नगरपालिकेच्या जलतरण तलावात पोहण्यासाठी जात असत.

रविवारी सकाळीही ते पोहण्यासाठी गेले असता पोहताना अचानक ते बुडाले. त्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. त्यांचा मृत्यू झाला होता. कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर येथील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे. पोहताना हृदयविकाराचा धक्का आल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे.