सातारा प्रतिनिधी | वाई तालुक्यातील धोम येथील नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून त्यामधील अंदाजे सहा हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याप्रकरणी वाई पोलिसांनी एकास ताब्यात घेतले.
सचिन आनंदा नवघणे (रा. टिटेघर, ता. भोर) असे संशयिताचे नाव आहे. धोम येथील चोरीप्रकरणी निरंजन पवार यांनी वाई पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा नोंद करून पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सचिन नवघणे याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून नवनाथ दत्त मंदिरातील चोरी केलेली रोख रक्कम सहा हजार रुपये ताब्यात घेतली.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे, तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पोलिस हवालदार अजित जाधव, कॉन्स्टेबल श्रावण राठोड, हेमंत शिंदे, नितीन कदम, विशाल शिंदे, राम कोळी, अजित टिके यांच्या पथकाने केली. पुढील तपास उपनिरीक्षक सुधीर वाळुंज करीत आहेत.