सातारा प्रतिनिधी । महिनाभरापूर्वी देगाव गावचे हद्दीत तसेच ३० जानेवारी रोजी बोपेगाव गावचे हद्दीत व २ फेब्रुवारी रोजी किकली गावचे हद्दीत अशा तीन ठिकाणी शेतामधील वीज वितरण कंपनीच्या ओव्हर हेड लाईनवर बसविलेले विद्युत ट्रान्सफार्मर चोरीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून २ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अमित बजरंग चव्हाण (मुळ रा. कुडाळ, ता. जावली, जि. सातारा, सध्या रा. खेड शिवापुर जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, देगाव, बोपेगाव आणि किकली भागात अज्ञात चोरटयाने खाली पाडुन तोडून फोडून ते कट करुन त्यामधील ऑईल खाली सांडून नुकसान करुन आतमधील तांब्याच्या तारा चोरी केल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठे नुकसान होत होते.
तसेच या चोऱ्या थांबण्यासाठी आरोपी मिळणे अत्यंत आवश्यक होते. सदर गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक श्री.समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.बाळासाहेब भालचिम यांनी सदरचे गुन्हे उघड करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे भुईंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि.रमेश गर्जे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उप-निरीक्षक विशाल भंडारे, रत्नदिप भंडारे, सहा. पो. फौजदार टकले, पोलीस अंमलदार नितीन जाधव, रविराज वर्णकर, सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, सागर मोहिते यांचे एक पथक तयार करण्यात आले होते.
सदर पथकास वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे, अभिलेखावरील गुन्हेगारांच्या हालचाली तपासणेबाबत सांगण्यात आले होते. सदरचा इसम सध्या खेडशिवापुर येथे राहण्यास असून अधुन मधुन कुडाळ येथे येत असतो. तपास पथकाने सदर संशयित इसमास दि. ९ फेब्रुवारी रोजी कुडाळ परिसरातून ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडे तपास केला असता त्याने त्याचे साथीदारासह खेड शिवापुर येथुन भुईज परिसरात येऊन भुईंज पोलीस ठाणे हददीतील डिपी चोरीचे ३ गुन्हे, हॉटेल विरंगुळा शेजारील एटीएम फोडण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा तसेच पुणे जिल्हयातील पौंड पोलीस ठाण्याच्या हददीतील मोटारसायकल चोरीचा १ व कात्रज पोलीस ठाण्याच्या हददीतील मोटर सायकल चोरीचा १ गुन्हा असे एकूण ६ चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले.
त्यामुळे आरोपीस गुन्हयात अटक करुन त्याचेकडुन डिपीचोरीतील १ लाख ४४ हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा तसेच १ लाख रुपये किमतीच्या दोन मोटर सायकल असा एकुण २ लाख ४४ हजार रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे. सदरचा आरोपी हा अभिलेखावरील अट्टल गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी सातारा तसेच पुणे जिल्हयात दरोडा, जबरी चोरी, बलात्कार, एटीएम चोरीचा प्रयत्न, डी.पी.चोरी असे एकुण ९ गुन्हे दाखल आहेत. गुन्हयाचा तपास चालू असून गुन्हयातील पाहिजे आरोपीचा शोध सुरु आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.बाळासाहेब भालचीम यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस ठाण्याचे सपोनि रमेश गर्जे, पोउनि विशाल भंडारे, रत्नदिप भंडारे, पोलीस अंमलदार वैभव टकले, नितीन जाधव, सोमनाय बल्लाळ, रविराज वर्णकर, सागर मोहिते, किरण निबाळकर यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला. कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक सातारा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.