सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ हद्दीतील धनगरवाडी गाव परिसरात एका आयशर टेम्पोने मालट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 3 जण जागीच ठार झाले आहेत. बुधवारी रात्री उशीरा हा अपघात झाला आहे. या अपघातात ठार झालेले तिघेही कर्नाटकातील आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या मार्गांवर ट्रकचा (क्रमांक KA53C8343) टायर फुटल्याने चालक टायर बदलत असल्याने ट्रक उभा होता. यावेळी पाठिमागून आलेल्या आयशर ट्रकने (KA 22 AA1551) उभ्या ट्रकला जोराची धडक दिली. यावेळी आयशर ट्रकच्या केबिनमध्ये चालकासह अन्य दोघेजण होते. अपघातात आयशर ट्रकची केबिन चेपल्याने तिघेही अडकले होते. या जखमींना शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी शिरवळ पोलिसांनी हलविले होते, मात्र उपचारापूर्वी तिघांचा मृत्यू झाला.
चिकमंगळूरहून मुंबईकडे निघालेल्या मालट्रकचा टायर फुटल्याने ट्रक महामार्गाच्या कडेला मोटे वस्तीसमोर उभा होता. टायर बदलल्यानंतर चालकाने टॅ्रक सुरू करून मार्गस्थ होत असतानाच आयशर टेम्पोने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघतातात टेम्पोतील तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की, मालट्रकमध्ये घुसल्यामुळे आयशर टेम्पोचा चक्काचूर झाला. पोलीस आणि शिरवळ रेस्क्यू टीमने क्रेन आणि जेसीबीच्या साह्याने टेम्पो बाजूला काढला. टेम्पो आणि ट्रकच्या भीषण अपघातानंतर पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
चालक, मालकासह क्लिनरचा मृत्यू
कर्नाटकातून पुण्याकडे निघालेल्या आयशरमध्ये स्वत: मालकासह अन्य एक चालक आणि क्लिनर, असे तिघेजण होते. अपघातावेळी स्वत: मालकच टेम्पो चालवत होता, अशी माहिती घटनास्थळावरून मिळाली. रस्त्याकडेला उभ्या असलेल्या भरधाव आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. त्यात या तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने आजुबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना माहिती दिली. अपघातात तिघांचेही मृतदेह छिन्नविछिन्न झाले आहेत. सकाळी मृताचे कुटुंबीय शिरवळमध्ये दाखल झाले असून मृतांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.