कराड प्रतिनिधी | मोठ्या उत्साहात आपल्या लाडक्या गणरायाचे सर्वांनी उत्साहात आगमन केले. गणेशोत्सवात सर्व समाज बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. हिंदू आणि मुस्लिम बांधव देखील गणेशोत्सव कालावधीत एकत्रित येत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवितात. या वर्षी अनंत चतुर्दशी व मोहंमद पैगंबर यांची जयंती एकाच दिवशी येत आहे. त्यामुळे त्या दिवशी प्रशासनावर मोठा ताण आहे. मात्र, कराड येथील मुस्लिम समाज बांधवांनी नुकताच एक चांगला निर्णय घेतला आहे. पैगंबर जयंतीची मिरवणूक त्या दिवशी न काढता ती दोन दिवसांनी 1 ऑक्टोबरला काढण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला आहे.
कराड येथे मुस्लिम समाज बांधवांनी तसेच मिरवणूक आयोजकांनी अनंत चतूर्दशी दिवशी मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेतल्याने सामाजिक सलोख्यासह ऐक्याचेच प्रतीक म्हणून निर्णयाचे प्रशासनासह नागरिकांनी स्वागत केले आहे. अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलाद म्हणजेच पैगंबर जयंती एकाच दिवशी गुरुवारी (ता. २८) आहे.
पैगंबर जयंतीनिम्मित शाही दरबार मिरवणूकीबाबत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार दि. 1 ऑक्टोबरला पैगंबर जयंतीची शाही दरबार मिरवणूक सकाळी साडेआठ वाजता जामा मशिद येथून सुरू होईल. प्रतिवर्षाप्रमाणे मिरवणूक मार्गावरून मिरवणूक शहरातून काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याच्या आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.