सातारा प्रतिनिधी । वाई विधानसभा मतदारसंघातून आज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी १३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता एकूण १५ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असणार आहेत मात्र खरी लढत दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवार आणि शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख असलेले अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्यातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाई विधानसभा मतदारसंघात सध्या विद्यमान आमदार मकरंद पाटील (राष्ट्रवादी अजितदादा) तर मविआकडून माजी जिप अध्यक्षा अरूणादेवी पिसाळ हे मैदानात आहेत; मात्र गेली अनेक वर्ष सातारा जिल्ह्यात शिवसेना वाढविण्यात मोठा सहभाग असणारे पुरूषोत्तम जाधव यांनी पक्षाचा राजीनामा देत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने वाई विधानसभा निवडणुकीतील रंगत वाढणार आहे.
या मतदारसंघात विद्यमान आमदारांवर सातत्याने घराणेशाहीचा आरोप होत आहेत तसेच लोकसभा निवडणुकीतही पुरेशा ताकीदीने काम न केल्याचे आरोप त्यांच्याच मित्रपक्षांकडून होत आहेत तर मविआच्या उमेदवार अरूणादेवी पिसाळ या जिल्हा परिषद अध्यक्षा म्हणून महत्वाच्या पदावर राहून मोठा कालावधी उलटलेला आहे. त्यातच राष्ट्रवादीत दोन गट पडले असल्याने त्यांच्या मतांमधे विभाजन झाले असून त्याचा फटका त्यांना निवडणुकीत बसू शकतो. तर गेली अनेक वर्ष शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून पुरूषोत्तम जाधव यांनी जिल्हात चांगली बांधणी केली आहे.
महायुतीकडून वाई मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेल्याने मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पुरुषोत्तम जाधव यांनी पक्षाचा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेल्याने मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पुरूषोत्तम जाधव यांनी पक्षाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी दाखल केली असून त्यांना महायुतीतील घटक पक्षांकडून छूपा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत असल्याने राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांच्या अडचणीत वाढ होणार हे नक्की.