सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सातारा लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेल्या महविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदेंना विरोधकांकडून टार्गेट करण्यास सुरुवात झाली आहे. साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर आज गंभीर आरोप केले. महेश शिंदे यांनी नवी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळे विक्री प्रकरणात 4 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. या आरोपावर आ. शशिकांत शिंदे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “मी सगळे पुरावे द्यायला तयार आहे. जर यामध्ये मी दोषी आढळलो, तर मी माझा उमेदवारी अर्ज भरणार नाही, असा थेट इशारा शिंदे यांनी दिला आहे.
आज एकनाथ शिंदे गटाचे आमदार कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांनी आज साताऱ्यात पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी थेट आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर आरोप केला. त्यांच्या आरोपानंतर शशिकांत शिंदे यांनी देखील माध्यमांशी संवाद साधत आरोपांना प्रत्युत्तर दिले.
यावेळी ते म्हणाले की, मविआकडून मी उद्या अर्ज भरणार आहे. शरद पवार उपस्थित असणार असून लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे विरोधक रडीचा डाव खेळत आहेत. छत्रपतींच्या गादीचा सन्मान करायचाच होता तर भाजपाने त्यांचे नाव अद्याप जाहीर का केले नाही?, छत्रपतींच्या गादीच्या सन्मानाच्या गोष्टी करणाऱ्यांनी छत्रपतींच्या गादीचा किती सन्मान ठेवला आहे, असा सवाल शिंदे यांनी केला आहे.