अर्जुन पुरस्कार विजेता ओजसचा ‘रयत’ने केला गौरव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेज महाविद्यालयाचा आंतरराष्ट्रीय खेळाडू, अर्जुन पुरस्कार विजेता ओजस प्रवीण देवताळे हा साताऱ्यात परतला आहे. तो साताऱ्यात परतताच संस्थेच्या आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या वतीने ओजसचा नुकताच गौरव करण्यात आला तसेच १० लाख रुपयांचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी संस्थेच्या मुख्य कार्यालयात बुधवारी पार पडलेल्या कार्यक्रमात चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ॲड. दिलावर मुल्ला, दृष्टी आर्चरी ॲकॅडमीचे प्रवीण जाधव आदी उपस्थित होते.

आर्चरी या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्ण कामगिरी नोंदवणारा ओजस हा मूळचा नागपूर येथील आहे. आर्चरी सारख्या क्रीडा प्रकारात अभिरुची निर्माण होऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याचे स्वप्न त्याने शालेय जीवनापासून पाहिले होते. १३ ते २१ ऑगस्ट या कालावधीत पॅरिस येथे झालेल्या ह्युंडाई विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत ओजसने कांस्यपदक प्राप्त केले. यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धा चीन हँगझोऊ येथे झाल्या.

राष्ट्रपतींच्या हस्ते ‘अर्जुन’ पुरस्काराने होणार सन्मानित

यामध्ये डबल व मिक्स गटामध्ये त्याने तीन सुवर्ण पदके पटकविली. वेस्ट झोन इंटरव्यू युनिव्हर्सिटी आर्चरी स्पर्धेत भटिंडा (पंजाब) येथे कंपाउंड राउंडमध्ये तीन सुवर्ण आणि एक रौप्यपदक मिळवून विद्यापीठाला वेगळा लौकिक प्राप्त करून दिला. ओजसच्या या कामगिरीची दखल घेऊन भारत सरकारने त्याला ‘अर्जुन’ पुरस्कार जाहीर केला. भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते ९ जानेवारी २०२४ रोजी त्याला ‘अर्जुन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.