साताऱ्यात गॅस गिझरच्या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या वृद्धेचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील व्यंकटपुरा पेठेतील केसकर काॅलनीत पाणी तापविण्यासाठी गॅस गिझर सुरू केला असताना स्फोट होऊन एक वृद्धा गंभीर जखमी झाल्याची घटना दि. २० रोजी सकाळी घडली होती. यातील जखमी वृद्धेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

सुलोचना शशिकांत माने (वय ७५) असे मृत्यू झालेल्या वृद्धेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, व्यंकटपुरा पेठेतील केसकर काॅलनीत राहत असलेल्या सुलोचना माने यांनी दि. २० रोजी सकाळी पाणी तापविण्यासाठी गॅस गिझर सुरू केला. काही वेळातच त्यांच्या गॅस गिझरचा मोठा स्फोट झाला. यामध्ये त्या भाजून गंभीर जखमी झाल्या. जखमी झाल्यानंतर घरातील काही मंडळींनी त्यांना तातडीने सातारा येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी कराड येथे दाखल करण्यात आले. रविवार, दि. २२ रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, हवालदार मालोजी चव्हाण हे अधिक तपास करीत आहेत.