लोकशाहीच्या वृध्द्धीसाठी तरुणांनी मतदान करावे : जीवन गलांडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । जगात सर्वांत मोठी व बळकट अशी भारताची लोकशाही आहे. या पूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का कमी होत आहे. हा टक्का वाढविण्यासाठी व लोकशाही वृध्दीगत करण्यासाठी तरुणांनी पुढे येऊन प्रत्येक निवडणुकांमध्ये मतदान करावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी केले.

25 जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त येथील कर्मवीर भाऊराव पाटील इंजीनिअरींग महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात श्री. गलांडे बोलत होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उपस्थितांना प्रतिज्ञा दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसिलदार राजेश जाधव, कराडचे तहसीलदार विजय पवार, प्राचार्या श्रीमती एस. जे. मादी आदी उपस्थित होते.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गलांडे म्हणाले, मतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत विविधी महाविद्यालसह विविध ठिकाणी विशेष शिबीराचे आयोनज करुन नव मतदारांच्या नोंदी करण्यात आलेल्या आहेत. तसेच 1 लाख 32 हजार मृत तसेच स्थलांतरीत नागरिकांची नावे वगळण्यात आली आहेत. गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील मतदानाची टक्केवारी सातारा जिल्ह्या पेक्षा जास्त आहे. प्रगत जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याची ओळख आहे. प्रत्येक निवडणुकांमध्ये तरुणांनी मतदान करावे. त्याचबरोबर ज्या तरुणांनी अद्यापर्यंत मतदार यादी नाव नोंदणी नाही अशांनी केंद्रस्तरीय मतदान अधिकारी यांच्याशी संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहनही श्री. गलांडे यांनी यावेळी केले.

प्रांताधिकारी श्री. भोसले म्हणाले, 14 वा मतदार दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या मतदार दिनानिमित्त मतदारांना त्यांचे हक्क व कर्तव्याची जाणीव करुन दिली जात आहे. तरुणांना ईव्हीएम-व्हीव्हीपॅट याबाबतची संपूर्ण माहिती व्हावी यासाठी महाविद्यालयांमध्ये प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा. मतदार यादी पुनिरीक्षण कार्यक्रमांतर्गत मृत व्यक्ती व स्थलांतरीत व्यक्तींची नावे वगळण्यात आली आहे. यामध्ये चुकुण कोणाचे नाव वगळले असेल त्यांनी संबंधित बीएलओ यांच्याकडे संपर्क साधून योग्य ते पुरावे सादर नाव समाविष्ठ करण्याची कार्यवाही करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री. गलांडे यांच्या हस्ते नव मतदारांना मतदान ओळखपत्र वाटपाबरोबर निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ठ काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.