सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सातारा शहरातील मध्यवर्ती बस स्थानक आणि मध्यवर्ती कार्यशाळा यांची आधुनिक स्वरूपात पुनर्बांधणी करावी, अशी मागणी केली होती. या मागणीनुसार दोन्ही कामांना शासनस्तरावरून मंजुरी मिळालेली असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे असल्याचे अधिकाऱ्यांनी सागिंतले.
यावेळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कार्यकारी अभियंता श्री नागेश कुलकर्णी, सातारा विभागाचे विभाग नियंत्रक श्री विकास माने, विभागीय वाहतूक अधिकारी श्रीमती ज्योती गायकवाड, विभागीय अभियंता श्रीमती प्रियांका काशिद, सातारा आगाराचे वरीष्ठ आगार व्यवस्थापक श्री. रत्नकांत शिंदे, कनिष्ठ आगार व्यवस्थापक श्रीमती स्वाती बांद्रे, सातारा नगरपालिका मुख्याधिकारी श्री अभिजित बापट, श्री. सुनिल काटकर, श्री. काका धुमाळ, श्री. पंकज चव्हाण, श्री. सुशिल मोझर, श्री. कुलदीप क्षीरसागर, ॲड. विनीत पाटील, ॲड. अजय मोहिते, श्री. प्रितम कळसकर हे उपस्थित होते.
सातारा बस स्थानक हे पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे बस स्थानक असून, येथे येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्यांची व प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. प्रवाशांच्या सोयीसाठी बस स्थानकास आत येण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी दोन वेगवेगळ्या मार्गांची आवश्यकता आहे, अशी नागरिकांची मागणी होती. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ते बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मध्यवर्ती इमारतीच्या बाजूच्या रस्त्यावर रँप तयार करण्यात यावा, अशी सूचना सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. अभिजित बापट यांना दिली आहे, जेणेकरून वाहनांना आणि अपंग प्रवाशांना अधिक सुलभता मिळेल. काम चालू असताना प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी मध्यवर्ती बस स्थानकाच्या शेजारी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीद्वारे केली. तसेच दोन्ही कामे दर्जेदार व जलदगतीने पूर्ण होऊन प्रवाशांच्या सेवेत लवकरात लवकर उपलब्ध व्हावीत, यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना खा. उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट सूचना दिल्या.