सातारा प्रतिनिधी | खुल्या प्रवर्गातील परंतु, ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शासनाच्या इतर कोणत्याही आयोग, महामंडळ, संस्था यांच्याकडून लाभ मिळत नाही, अशा आर्थिक दुर्बल घटकांच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी, पुणे) या संस्थेची राज्य सरकारने स्थापना केली आहे. या संस्थेच्या संचालिका तसेच जिल्हा पालक अधिकारी हे सातारा येथे शुक्रवार दि १२ जानेवारी रोजी समाजातील विविध घटकांची तसेच लाभार्थ्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. ‘अमृत’च्या विविध योजनांचा प्रसार, प्रसार करणे व लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा दौरा आहे.
राज्य शासनाचा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘अमृत’ हा अतिशय महत्वांकांक्षी प्रकल्प आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)च्या राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना अर्थसहाय्य देणे, संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी निवड केलेल्या उमेदवारांना अर्थसहाय्य देणे, आर्थिक विकासाकरिता प्रोत्साहन व प्रशिक्षण कार्यक्रम राबवून स्वावलंबी बनविणे, कृषी उत्पन्न आधारित लघुउद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देवून स्वावलंबी बनविणे, कौशल्यविकास प्रशिक्षण व नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधणे आदी योजना ‘अमृत’मार्फत राबविल्या जात आहेत.
या योजनांची खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु, इतर कोणत्याही शासकीय कार्यालय, महामंडळे अथवा संस्थांमार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा घटकांना लाभ देण्यासाठी ‘अमृत’चे सर्व वरिष्ठ अधिकारी हे राज्यव्यापी दौर्यावर आहेत. त्यानुसार, ‘अमृत’च्या संचालिका सौ. अस्मिता बाजी या (दि.12) सातारा येथे असून ते शहर व जिल्ह्यातील विविध मान्यवरांसह लाभार्थ्यांच्या भेटीगाठी, तसेच प्रशासकीय अधिकारीवर्गाशी चर्चा करणार आहेत.
दुपारी 2 वाजता सुपडेकर हॉल येथे त्या बैठक घेणार आहेत. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा समन्वयक हेमंत कोरडे हेदेखील राहणार आहेत. इच्छुकांनी या अधिकार्यांच्या भेटीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9372025136 अथवा 9657040452 वर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आलेले आहे.