मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत गतिमानता पंधरवडा; लाभ घेण्याचे आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राज्य शासनाच्या उ‌द्योग विभागामार्फत ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ (सीएमईजीपी) योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत दि. ३० डिसेंबरपर्यंत सुरू असलेल्या गतिमानता पंधरवड्याचा लाभ नवउद्योजकांनी नवीन उद्योग, अस्तित्वातील उद्योगांचे विस्तारीकरण आदींसाठी घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उ. सु. दंडगव्हाळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या संकल्पनेनुसार १७ ते ३० डिसेंबरपर्यंत हा मुख्यमंत्री रोजगार योजना गतिमानता पंधरवडा राबविण्यात येत आहे. अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना योजनांची माहिती व्हावी, त्यांनी अर्ज करावेत आणि त्या माध्यमातून सन २०२३- २४ ची उदिष्टपूर्ती व्हावी हा या पंधरवड्याचा मुख्य उद्देश आहे.

हा पंधरवडा यशस्वी होण्यासाठी उद्योग संचालनालय आणि खादी व ग्रामोद्योग विभाग अधिनस्त सर्व महाव्यवस्थापक, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, कर्मचारी केवळ ‘सीएमईजीपी’ योजनेचे काम करणार आहेत. यासाठी सर्व महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये तसेच शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अशासकीय संस्था येथे योजनेचे जनजागृती मेळावे, प्रचार व प्रसि‌द्धी कार्यक्रम आयोजित करून पात्र लाभार्थ्यांचे जागेवर अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. हे अर्ज पोर्टलवर तात्काळ अपलोड करण्यात येणार आहेत.

एमसीईडी, मिटकॉन, आर-सेटी आदी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांतील तरुण- तरुणींची यादी घेऊन त्यांना या योजनेची माहिती देणे, महिला आर्थिक विकास महामंडळ, उमेद, महिला बचत गट यांना संपर्क साधून महिला मेळावे घेत महिलांना प्राधान्याने या योजनेत सहभागी होण्यासाठी कृती आराखडा तयार करून काम करणे आदी काम या पंधरवड्यात करण्यात येणार आहे.

सर्व तालुक्यांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार

सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार असून अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, सातारा, प्लॉट नं. ए-१३, जुनी एमआयडीसी, सातारा दूरध्वनी क्रमांक ०२५६२- २४४६५५ ई-मेल आयडी [email protected] येथे संपर्क साधावा, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उ. सु. दंडगव्हाळ यांनी कळविले आहे.