कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदार संघातील निवडणूक विभाग प्रशासन मतदानाच्या प्रक्रियेसाठी सज्ज झाले आहे. दि. २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. दरम्यान, मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार गहू नये व गहू देऊ नये यासाठी मतदान अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचना देखील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत.
मतदानाच्या एक दिवस अगोदर मतदान अधिकारी, कर्मचारी यांना मतदान केंद्र गाठावे लागते. बहुतेक केंद्रांवर रात्रीच्या जेवणाला पार्टीचे स्वरूप आलेले असते. परंतु मतदान केंद्रावर मद्य सेवन करून ड्यूटी बजावणे शासकीय कर्मचाऱ्याला महागात पडू शकते. असा प्रकार आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यास तत्काळ निलंबित करून शिस्तभंगाचा प्रस्ताव संबंधित कर्मचाऱ्याच्या विभागास पाठविला जातो.
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील बहुतांश शिक्षकांसह इतर विभागातील कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात आली आहे. यासंदर्भातील पत्रे संबंधितांना यापूर्वीच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावतीने पाठविण्यात आली आहेत. निवडणूक कामास नकार दिला किंवा कामावेळी गैरहजर राहिल्यास त्या कर्मचाऱ्यावर लोकप्रतिनिधी अधिनियम १९५० मधील कलम ३२ व १३४ नुसार थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो तसेच त्या कर्मचाऱ्याची चौकशी करण्यात येते. शिवाय संबंधित कर्मचाऱ्यांविषयी शिस्तभंगाचा प्रस्ताव त्याच्या विभागास पाठविण्यात येतो. त्यामुळे मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने कामे पार पाडावीत, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.
संवेदनशील केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर आणि चोख बंदोबस्त राहणार आहे. यासाठी पोलीस यंत्रणा देखील सज्ज झाली आहे.
१ दिवस आधी मतदान केंद्रावर जाणार
मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी साहित्यासह एक दिवस आधी मतदान केंद्रांवर पोहोचणार आहेत. त्यांना मतदान केंद्रांवर पोहचवण्यासाठी निवडणूक विभागाकडून वाहनांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
मतदान केंद्रांवर राहणार तगडा बंदोबस्त
सतः जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. निवडणूक विभागाचीही नजर राहणार आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे देखील तैनात करण्यात आलेले आहेत.
दारू प्यायल्याचे आढळल्यास निलंबन
निवडणूक कामात ऑन ड्युटी असताना कुणीही हयगय करू नये, प्रत्येकाने जबाबदारीने काम करावे, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केल्या आहेत. यात हयगय केल्यास कारवाई होणार आहे.