सातारा प्रतिनिधी । भारत निवडणूक आयोग आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ घोषणा केली असून याची आचार संहिता दि. 16 एप्रिल रोजी सायं 4 वाजल्यापासून जाहीर झाली आहे. या निवडणूक काळात जिल्हा प्रशासनाकडून अनेक उपक्रम तसेच निवडणूक कार्यक्रम राबविले जात आहेत. या अनुषंगाने सातारा जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी हे प्रत्येकी १० मतदारांची जबाबदारी घेणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच एक कार्यशाळा पार पडली. तसेच संबंधितांना याबाबत प्रतिज्ञाही देण्यात आली.
सातारा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये मतदार जनजागृतीविषयी ‘मी जबाबदारी घेणार’ या अभियानाची कार्यशाळा नुकतीच पार पडली. या अभियानात जिल्हा परिषद अंतर्गत सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रत्येकी १० मतदारांची जबाबदारी घेतली. तसेच संबंधित मतदाराने प्रत्यक्ष मतदान करेपर्यंतची जबाबदारीही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली.
या कार्यशाळेदरम्यान मतदानाविषयी प्रतिज्ञाही देण्यात आली. या कार्यशाळेस जिल्हा परिषदेतील जिल्हा ग्रामविकास यंत्रणा, सामान्य प्रशासन विभाग, ग्रामपंचायत, महिला व बालकल्याण, बांधकाम विभाग, जलसंधारण, शिक्षण, आरोग्य तसेच स्वीप कक्षात कार्यरत असणारे कर्मचारी उपस्थित होते.