आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी आता Google Location द्वारे उपस्थिती लावणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील नागरिकांना तसेच रुग्णांना उत्तम आरोग्यदायी सुविधा व उपचार देता याव्यात यासाठी आरोग्य विभागाकडून अनेक उपक्रम राबविले जातात. मात्र, काहीवेळा आरोग्य केंद्राबद्दल तक्रारी देखील केल्या जातात. त्या दूर व्हाव्यात तसेच अधीकारी, कर्मचाऱ्यांच्या कामात सुधारणा व्हावी, यासाठी सातारा जिल्हा परिषद प्रशासनाकडून सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना गुगल लोकेशनद्वारे उपस्थिती लावण्याची सूचना करण्यात आल्या आहेत.

सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जनतेस आवश्यक आरोग्य सेवा तत्काळ मिळणे हा केंद्रबिंदू ठेवून आरोग्य केंद्राच्या कामकाजात सुधारणा करण्यात आलेली आहे. तसेच आरोग्य सेवेचा लाभ जनतेस होण्याच्यादृष्टीने उपाययोजनाही सुरू आहेत. यामध्ये काही स्थानिक लोकप्रतिनिधींकडून तसेच रुग्णांच्याही तक्रारी प्राप्त होत असतात. या तक्रारींचे निवारण करणेही गरजेचे असते. यासाठीही गुगल लोकेशनचा पर्याय स्वीकारण्यात आलेला आहे.

कामकाजाची अशी वेळ निश्चित

अशा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज हे सकाळी साडे आठ ते दुपारी साडे बारा आणि त्यानंतर दुपारी चार ते सायंकाळी सहापर्यंत निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याबाबत लोकेशन शेअर करणे आवश्यक केले आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक असते. त्यामुळे एका वैद्यकीय अधिकाऱ्याने केंद्राच्या ठिकाणी हजर राहणे आवश्यक आहे. तर दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याने भागातील उपकेंद्राच्या ठिकाणी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेणे महत्वाचे आहे.

अशी आहे रुग्णालयाची संख्या

सातारा जिल्ह्यात ग्रामीण भागात दर ३० हजार लोकसंख्येत एक (डोंगरी भागात २० हजार लोकसंख्येमागे एक) प्राथमिक आरोग्य केंद्र आणि दर ५ हजार लोकसंख्येत एक आरोग्य उफद्र (डोंगरी भागात ३ हजार लोकसंख्येमागे एक) या निकषाप्रमाणे जिल्हयात प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. जिल्हयात १ सामान्य रुग्णालय, १७ ग्रामीण /कुटीर रुग्णालय, ७१ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ६ प्राथमिक आरोग्य पथके, ४०० उपकेंद्रे व १७ जिल्हा परिषद आयुर्वेदीक दवाखाने कार्यरत आहेत.