सातारा पालिकेत प्रारूप विकास आराखड्यावर ‘इतक्या’ जणांकडून हरकती दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा पालिकेकडून तयार करण्यात आलेल्या सातारा शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर नागरिकांकडून हरकती घेण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या दरम्यान, शहर व हद्दवाढ भागातील नागरिकांकडून तब्बल १ हजार ८५ हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. या हरकतींवर पालिकेत मंगळवारपासून (दि. २८) सुनावणी सुरू झाली असून पहिल्या दिवशी १७७ नागरिकांनी आपले म्हणणे समितीपुढे मांडले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी १८७ नागरिकांनी आपले म्हणणे समितीपुढे देण्यासाठी नियोजन केले. पण त्यापैकी आठ जण गैरहजर असल्याने १७९ जणांनी समितीपुढे म्हणणे मांडले.

सातारा पालिकेद आखलं करण्यात आलेल्या प्राप्त हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी शासनाकडून एक समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये नगररचना विभागाचे निवृत्त उपसंचालक मधुकर देवडे, निवृत्त सहायक संचालक अनिल पाटील, निवृत्त नगररचनाकार शेखर चव्हाण, वास्तुविशारद प्रसाद कस्तुरे तर पालिकेचे प्रतिनिधी म्हणून प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट यांचा समावेश आहे.

स्थापन करण्यात आलेल्या या पाच सदस्यीय समितीने बुधवारी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात १७९ हरकतधारकांचे म्हणणे तोंडी स्वरुपात ऐकून घेत त्यांच्या आक्षेपांच्या तपशीलवार नोंदीही घेण्यात आल्या. प्रारूप आराखड्यावरील हरकतींची सुनावणी दि. २८ ते दि. ३१ मे व दि. ५ ते दि. ६ जून अशी दोन टप्प्यांत पूर्ण होणार आहे. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर नियोजन समिती आपला अहवाल पालिकेकडे सादर करणार आहे.