कराड प्रतिनिधी । सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या बुधवारी शेवटच्या दिवशी 251 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 17 उमेदवारी अर्ज दुबार होते. त्यामुळे 21 जागांसाठी 234 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील 17 दुबार अर्ज बाद झाले तर मानसिंगराव जगदाळे आणि निवासराव थोरात या दोघांच्या अर्जावर हरकत घेण्यात आली. त्यावरील निकाल आणि छाननीत वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी शुक्रवारी जाहीर करण्यात येईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रीक यांनी दिली.
सह्याद्रि कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीच्या कालच्या शेवटच्या दिवशी इच्छुक व त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. काल शेवटच्या एकाच दिवशी तब्बल 157 उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्या दाखल अर्जांची छाननी आज निवडणूक निर्णय अधिकारी सुद्रीक, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांच्या उपस्थितीत झाली. त्यासाठी उमेदवार, त्यांचे समर्थक आज मोठ्या संख्येने उपस्थित होते. दाखल उमेदवारी अर्जांची छाननी गटनिहाय करण्यात आली. त्या छाननीत सुरुवातीला दुबार भरण्यात आलेले 17 उमेदवारी अर्ज बाद झाले. त्यानंतर कागदोपत्री अपुर्तता व अन्य कारणामुळे काही अर्ज बाद झाले. त्याची माहिती शुक्रवारी देण्यात येणार आहे.
दाखल अर्जांची छाननी सुरु असताना मुरलीधर गायकवाड यांनी निवास थोरात यांच्या अर्जावर तर वसंतराव जगदाळे यांनी मानसिंगराव जगदाळे यांच्या अर्जावर हरकत घेतली. त्याची सुनावनी निवडणुक निर्णय अधिकारी सुद्रीक यांच्यासमोर झाली. त्यामध्ये थोरात व जगदाळे यांच्या बाजूने त्यांच्या-त्यांच्या वकीलांनी युक्तीवाद केला. त्यानंतर त्याचा निर्णय रात्री उशीरापर्यंत जाहीर करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची उत्सुकता ताणली होती. त्याचा निकाल आणि छाननीत वैध ठरलेल्या उमेदवारी अर्जांची उद्या यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी सुद्रीक यांनी सांगितले.