सातारा प्रतिनिधी | नववर्षाच्या पार्श्वभूमीवर तीस तारखेपासून सलग तीन दिवस किल्ला बंद राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ट्रेकर्स, पर्यटकांना भुरळ घालणारा वासोटा किल्ला शनिवारी आणि रविवारी पर्यटकांच्या गर्दीने बहरून गेला होता.
भैरवनाथ बोट क्लब बामणोली, ब्राविमश्वर बोट क्लब शेंबडी, केदारेश्वर बोट क्लब मुनावळे या तीन बोट क्लबमधील शेकडो बोटीतून हजारो पर्यटकांनी किल्ले वासोट्याचा ट्रेक केला.
सध्या थंडीची हंगाम असल्याने वासोटा किल्ला पाहण्यासाठी शनिवार, रविवार व सुटीच्या दिवशी पर्यटक बामणोली, शेंबडी, मुनावळे या संपूर्ण परिसरामध्ये आदल्या दिवशी मुक्कामासाठी गर्दी करत असून हॉटेल, तंबूंचे बुकिंग आठवडाभर अगोदरच होत आहे. त्यातच तंबूंमध्ये राहण्याची मजा काही वेगळीच असल्याने, त्याजवळच शेकोटी करून त्याभोवती कराओके गाण्यांची मैफील रंगवत पर्यटक रात्री जागून काढत आहेत.
या परिसरामध्ये मुक्कामाची सोय अपुरी पडल्यावर पर्यटक सह्याद्रीनगर, कोळघर, अंधारी, फळणी, उंबरेवाडी, कास या परिसरात देखील तंबू लावून मुक्कामाचा आनंद लुटत आहेत. बामणोली, शेंबडी, मुनावळे या ठिकाणाहून तास, दीड तासाचा बोटीचा प्रवास करून पर्यटक किल्ल्याच्या पायथ्याला गेल्यावर घनदाट जंगलातून ट्रेकला सुरुवात करतात. या घनदाट जंगलातून जाताना वेगवेगळ्या पशू-पक्ष्यांचे आवाज ऐकत निसर्गसौंदर्याचा आनंद लुटत आहेत.