सातारा प्रतिनिधी । श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सालाबादप्रमाणे दि. 29 जून 2024 रोजीपासून सुरू होणार आहे. दि. 6 जुलै 2024 रोजी पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होणार असून दि. 11 जुलै 2024 रोजी पालखी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या पार्श्वभूमीवर काल ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने लोणंद पालखी तळ, विसावा, तरडगाव पालखीतळ, महामार्ग आदि ठिकाणाची पाहणी करण्यात आली.
यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे पालखी विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजनाथ, बाळासाहेब चोपदार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी निरा नदीवरील पादूका स्नान घाटास सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास भेट दिली. यावेळी नदीपात्राची स्वच्छता लवकरात लवकर करण्याच्या सुचना विश्वस्तांकडून करण्यात आल्या. त्याचबरोबर निरा स्नानाच्या वेळेस होणारी गर्दी लक्षात घेता योग्य तितक्या बॅरिगेटस लावाव्यात अशी सूचना पोलीस प्रशासनास केली.
यावेळी फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, वाई उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, खंडाळ्याचे तहसिलदार अजित पाटील, फलटणचे तहसीलदार अभिजीत जाधव, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता खोसे, सहायक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले, पाडेगांवचे विजयराव धायगुडे, शंकरराव मदनि, गजानन माने, माजी सरपंच हरिश्चंद्र माने, संतोष माने, रघुनाथ धायगुडे, संतोष मदनि आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच सकाळी चांदोबाचा लिंब येथील उभे रिंगण तसेच तरडगाव मुक्काम येथील पहाणी करून विश्वस्त मंडळ सकाळी दहाच्या दरम्यान लोणंद पालखीतळावर आले होते. विश्वस्त कमिटीने लोणंद येथील पालखीतळाला भेट देऊन तेथील कामाचा आढावा घेतला तसेच आवश्यक त्या सुचना केल्या. यावेळेस लोणंद नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सीमा वैभव खरात, उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर, नगरसेवक शिवाजीराव शेळके-पाटील, सचिन शेळके, गणीभाई कच्छी, सागर शेळके, बाजार समितीचे सभापती सुनिल शेळके, मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड आदी उपस्थित होते.