सातारा प्रतिनिधी | राज्यात ई-पीक पाहणी उन्हाळी हंगाम सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ एप्रिल पासून ई-पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) मोबाईल अॅपद्वारे पीक नोंदणी करावी लागत आहे. शेतकऱ्यांना सरकारी अनुदान, नुकसानभरपाईसाठी मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी करावी, असे आवाहन महसूल उपजिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेतकरी स्तरावरून मोबाईल अॅपद्वारे ई-पीक – पाहणी नोंद करण्यात येते व शेतकरी स्तरावरील कालावधी संपल्यानंतर कृषी सहायकांमार्फत उर्वरित शेतकऱ्यांची पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे नोंदवण्यात येणार आहे. डिजिटल क्रॉप सर्व्हे हा अॅग्रिस्टॅक या प्रकल्पासाठी तयार करायची हंगामी पिकांचा माहिती संचसाठी उपयोगात येणार आहे. या हंगामी पिकाचा माहिती संच हा राज्यातील सर्व कृषक जमिनींच्या पीक पाहणीसंदर्भात १०० टक्के पीक पाहणी व शेताच्या बांधावर जाऊन फोटो काढून पीक पाहणी ही या प्रकल्पाची वैशिष्ट्ये आहेत. ई-पीक पाहणीसाठी सहायक म्हणून कोतवाल, ग्रामस्तरीय कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे. My Bharat पोर्टलवर नोंदणी केलेल्या नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक यांची मदत सहायक म्हणून डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी घेता येणार आहे.
१ एप्रिलपासून उन्हाळी हंगामातील ई-पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) मोबाईल अॅपद्वारे नोंदवता येणार आहेत. १ एप्रिल ते १५ मे या कालावधीत शेताच्या किमान ६० टक्के पीक पाहणी करून घेणे ही कृषी सहायकाची जबाबदारी आहे. सहायक नेमणूक केल्यानंतर सहायक म्हणून काम करण्यासाठी संबंधित कर्मचारी डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) मोबाईल अॅपद्वारे १६ मे ते २९ जून या कालावधीत पीक पाहणी नोंदवू शकतील. पीक नोंदणीची पूर्ण जबाबदारी ही सहायकावर असणार आहे. जे शेतकरी ई-पीक पाहणी अॅपमधून पिकांची नोंदणी करणार नाही, त्यांना कोणत्याही पिकाच्या संदर्भात अनुदान मिळणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंद डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) मोबाईल अॅपद्वारे शेतकरी लॉगिनमधून करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.