आता मुलांना मिळणार वनांची माहिती; ‘चला जाणूया वनाला’ निसर्ग पर्यटन योजना

0
1

सातारा प्रतिनिधी | निसर्ग पर्यटन योजना महाराष्ट्र राज्याच्या महसूल व वन विभागामार्फत निसर्ग पर्यटन धोरणास अनुसरुन सामाजिक वनीकरण विभाग “चला जाणूया वनाला” या उपक्रम अंतर्गत प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांकरिता सुसंगत धोरण विकसितकरीत आहे. या करिता सामाजिक वनीकरण विभागातील कार्यक्षेत्रात एकूण 11 तालुके असून त्यामध्ये 10 वनपरिक्षेत्र कार्यालये आहेत. या विभागाअंतर्गत एकूण 250 शाळा असून त्यापैकी प्रति तालुक्यातून 5 शाळांची निवड करुन 40 विद्यार्थी प्रती शाळा आधारभूत मानून एकूण 2 हजार 300 शालेय विद्यार्थ्यांना निसर्ग पर्यटन क्षेत्रात भेटी देऊन निसर्गानुभव देण्याचे प्रस्तावित आहे.

शालेय विद्यार्थ्याकरिता प्रत्यक्ष स्थळावर जाऊन प्रत्यक्ष वनांचा अभ्यास करण्यास या उपक्रमामुळे नाविन्यपूर्ण संधी प्राप्त होणार आहे. सदर उपक्रमामध्ये प्रामुख्याने वनभ्रमंती, पक्षी निरीक्षण, रोपवाटीका अभ्यास दौरा इत्यादी प्रमुख बाबींचा समावेश अंतर्भूत आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना निसर्ग पर्यटनाबरोबर वनांमधील झाडांची माहिती होणार आहे. हा उपक्रम 15 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

‘चला जाणूया वनाला’ या उपक्रमांतर्गत मिळालेला निधी हा मुख्यतः जंगलातील फेरफटका, पक्षी निरीक्षण, रोपवाटिका अभ्यास दौरे, राष्ट्रीय उद्यान/अभयारण्य भेटी, विद्यार्थी उपक्रम इत्यादी प्रमुख उपक्रमांसाठी आहे. सदर मोहिमेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वन व वन्यजीव तसेच पर्यावरणासंबंधी सकारात्मक दृष्टीकोन व पर्यावरणपूरक वर्तणूक वृध्दींगत होणार आहे. पर्यावरणाच्या प्रश्नांची जाण असलेली व पर्यावरणविषयक संवेदनशील अशी नवीन पिढी तयार करण्याचे काम या योजनेअंतर्गत होणार आहे.

विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या समस्येबाबत तसेच सद्यस्थितीबाबत विविध उपक्रमांद्वारे अद्ययावत माहिती देणे, पर्यावरण संरक्षणाच्या व संवर्धनाच्या प्रत्यक्ष कामामध्ये त्यांना सहभागी करून घेणे आणि त्यांच्या माध्यमातून जन सामान्यामध्ये जनजागृती करणे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

मोहिमेअंतर्गत भेट देणाऱ्या स्थळाचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे तसेच लोकांचा वन पर्यटन संदर्भातील दृष्टीकोन बदलण्यास मदत होणार आहे.चला जाणूया वनाला या महत्त्वाकांक्षी मोहिमे दरम्यान शालेय विद्यार्थ्यांना प्रामुख्याने स्थळनिहाय पाहणी दरम्यान आत्मसात करण्याची संधी निर्माण होणार असून विद्यार्थ्यांव्दारे समाजातील अन्य घटकांस त्यांचे अनुभव कथनातून निसर्ग पर्यटनाबाबत महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त होणार आहे.

उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना पर्यावरणविषयक समस्यांची अद्ययावत माहिती देणे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ऑन-साइट तपासणीत सहभागी करून घेणे. सामाजिक स्तरावर उपक्रमाचा प्रचार आणि प्रचार करण्यास मदत करणे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता आणि समाजात जनजागृती करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. निसर्ग अनुभव सहलीवर आधारीत बहुपर्यायी प्रश्नावली माध्यमातून शाळेत चाचणी परिक्षा आयोजित करुन त्यात प्रथम, व्दितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर रुपये 500, 300 वरून 200 बक्षिस देण्यात येणार आहे. जेणेकरुन विद्यार्थी संपूर्ण निसर्ग अनुभव सहलीत सजग व जागृत राहील.