सातारा प्रतिनिधी । दिवाळी व इतर सणाच्या वेळी मोठ्या आवाजाचे फटाके उडविण्यामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी व हवा प्रदुषणाचे जनतेवर होणारे संभाव्य अपायकारक परिणाम टाळण्यासाठी असे फटाके वाजविण्यावर निर्बंध घालणेबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडून नुकतेच आदेश पारित करण्यात आलेले आहेत. मान्यताप्राप्त संवर्गातील नसलेले फटाके उडविणे तसेच शोभेचे दारु काम निष्काळजीपणाने करणे इत्यादी संभाव्य कृत्यामुळे जनतेच्या जिवितास व मालमत्तेस हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारे हानी होऊ नये म्हणून तसेच रहदारीच्या नियमनासाठी व सार्वजनिक शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी महत्वाचे आदेश जारी केले आहे. सातारा जिल्ह्यात आजपासून दि. २९ ते दि. 3 नोव्हेंबर कालावधीपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.
पोलीस अधीक्षकांनी पारित केलेल्या आदेशात म्हटले आहे की, फटाका उडविण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरापर्यंत 125 डेसीबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांची उत्पादन, विक्री व वापर यावर बंदी घालण्यात येत आहे. साखळी फटाक्यासाठी वरील क्र. १ मध्ये नमुद केलेल्या आवाजाच्या मर्यादेच्या पातळीत 5 Log 10 डेसीबल पर्यंत शिथीलता देण्यात येत आहे. ज्यात एका साखळी फटाक्यातील एकूण फटाक्यांची संख्या उदा. साखळी फटाक्यात एकूण 50, 50 ते 100 आणि त्यावरील फटाके असतील आवाजाची मर्यादा फटाका उडविण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरापर्यंत अनुक्रमे 115, 110 व 105 डेसिबल एवढी असावी.
रात्री दहानंतर फटाके उडवण्यास बंदी
दिवाळी या सणानिमित्त जनतेला फटाके उडविणेस सकाळी 6 ते रात्री 10 वा. चे परवानगी राहील. रात्रौ 10 ते सकाळी 6 वा. पर्यंत उर्वरित वेळेत फटाक्यांचे, दारुकाम किंवा फटाके यांचा वापर करण्यास मनाई आदेश करण्यात येत आहे.
अशा प्रकारच्या फटाक्याना विक्रीस असणार बंदी
25 ग्रॅम पेक्षा जास्त वजनाचे 3.8 से.मी. पेक्षा जास्त लांबीचे व अॅटमबॉम्ब नावाने ओळखले जाणाऱ्या फटाक्यांची व क्लोरटचा समावेश असलेले फटाके विक्री केली जाणार नाही. तीन इंचापेक्षा जास्त लांबीचा आणि अर्धा इंचापेक्षा जास्त व्यासाचे कागदाचे नळीपासून केलेला गणपावडर व नायट्रेट मिश्रीत परंतू क्लोरेट नसलेल्या चिनी फटाक्यांची विक्री केली जाणार नाही.
फटाक्यांच्या दुकानासाठी असे आहेत नियम
फटाक्यांची दुकाने जमिनीलगत असावीत परवानाप्राप्त प्रत्येक स्टॉलमध्ये 100 कि.ग्रॅ. फटाके व 500 कि.ग्रॅ. चायनीज क्रॅकर (शोभेचे फटाके ) यापेक्षा जास्त साठा असणार नाही. प्रत्येक स्टॉलमधील अंतर 3 मीटरपेक्षा कमी नसावे तसेच कुठल्याही सुरक्षीत घोषीत केलेल्या सिमेपासून 50 मीटरपेक्षा कमी अंतरावर स्टॉलची जागा नसावी. एकापेक्षा जास्त स्टॉल असतील तर त्याचे प्रवेशव्दार समोरासमोर नसावे. एका ठिकाणी 50 पेक्षा जास्त स्टॉल नसावेत. अशा प्रकारे एकापेक्षा जास्त समुह होत असतील तर दुस-या प्रत्येक समुहातील अंतर 50 मीटर पेक्षा कमी नसावे. स्टॉलचे ठिकाणी तेलाचा दिवा, मेणबत्ती निषीध्द आहे. विद्युत प्रवाह वायरिंग योग्यरितीने केलेली आहे याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. विदयुत निरीक्षकाकडून प्रमाणीत करावे. फटाक्याच्या दुकानाचा आपत्कालीन मार्ग हा नेहमी खुला असावा त्यात कुठल्याही प्रकारचा अडथळा नसावा तसेच स्टॉलच्या ठिकाणी धुम्रपानास सक्त मनाई आहे. योग्य अग्नीप्रतिबंधक उपाययोजना केलेली असावी. फटाके हाताळण्यासाठी पुरेशी जागा असावी व दुकानात ग्राहकांची गर्दी होवू देवू नये. कुठल्याही अपघातास तोंड देण्यासाठी योग्य सुरक्षा व्यवस्था केलेली असावी. खराब स्थितीत असलेल्या कुठल्याही फटाक्यांची विक्री होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
‘या’ ठिकाणी फटाके वाजवण्यास बंदी
शांतता प्रभागात कोणत्याही फटाक्यांचा वापर कुठल्याही वेळेत करण्यात येवू नये शांतता झोनमध्ये रुग्णालय, शैक्षणिक संस्था इत्यादीच्या सभोवतालचे 100 मीटर पर्यंतचे क्षेत्र येते तसेच पेट्रोलपंप, केरोसीन व इतर ज्वालाग्रही पदार्थांचा साठा व विक्री करण्याच्या ठिकाणापासून 100 मीटरचे परिसरात कोणत्याही फटाक्यांचा वापर कुठल्याही वेळेत करण्यात येवू नये. रॉकेट डोक्याचा भाग हा 10 से.मी. पेक्षा जास्त लांबीचा नसावा व 2.5 से.मी. पेक्षा जास्त जाडीचा व्यास नसावा. आपटबार व उखळीदारु उडविण्यास मनाई आहे. त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे फटाका विक्रीधारक व नागरिकांनी परदेशी फटाके बाळगू नये किंवा विक्री करु नये. 10 हजार फटाके पेक्षा जास्त लांबीची फटाक्यांची माळ असता कामा नये त्यावर बंदी आहे. नागरिकांनी फटाके गर्दीच्या ठिकाणी न उडविता मोकळया जागेत जेथे वस्ती व वर्दळ नाही अशा ठिकाणी तसेच शांतता क्षेत्रामध्ये ( रुग्णालये, प्रसुती गृहे, प्राथमिक व जिल्हा आरोग्य केंद्रे, शैक्षणीक संस्था – शाळा-कॉलेजेस, न्यायालये, धार्मिक स्थळे इ.) फटाके उडवू नयेत.
पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे पालन न केल्यास होणार दंड
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (यु) अन्वये केलेले नियम / आदेशाचा भंग केल्यास कलम 131 (ख) (1) अन्वये 8 दिवसांपर्यंत इतक्या कारावासाची किंवा रु. 1250/- (अक्षरी एक हजार दोनशे पन्नास रुपयांपर्यंत) वाढविता येवू शकेल इतक्या द्रव्य दंडाची शिक्षा होईल. किंवा या दोन्ही शिक्षा होतील. फटाके तयार करणारे व विक्री करणाऱ्यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कोणत्याही परिस्थितीत फटाक्यांचे आवाज हे 125 डेसीबलपेक्षा जास्त असता कामा नये.