वाहनांवरील मोटार कर, पर्यावरण कर, थकवल्या प्रकरणी 10 हजार 150 वाहनधारकांना नोटिसा

0
540
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | वाहनांवरील मोटार कर, पर्यावरण कर, थकवल्याप्रकरणी सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुमारे 10 हजार 150 वाहनधारकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये खासगी व परिवहन संवर्गातील वाहनांचा समावेश असून, नोटीस पाठवलेल्या वाहनधारकांनी कर न भरल्यास वाहने जप्त करण्यात येणार आहेत.

प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी केलेल्या व्यावसायिक वाहनांकडून वार्षिक कर आकारला जातो. तसेच नॉन ट्रान्स्पोर्ट वाहनांकडून नोंदणीच्या वेळीच एकरकमी टॅक्स भरणा करुन घेतला जातो. यामध्ये मोटार वाहन कर व पर्यावरण कराचा समावेश आहे. व्यावसायिक वाहनांनी ठराविक कालावधीनंतर कर भरणे अपेक्षित असते. सातारा जिल्ह्यात 10 हजार 150 वाहने कर न भरता रस्त्यावर धावताना दिसत आहेत. गेल्या 15 वर्षांपासून या वाहनांकडे विविध करांची थकबाकी आहे. सातारा जिल्ह्यातील 10 हजार 150 वाहनधारकांकडे सुमारे 2 कोटी 96 लाख 52 हजार रुपयांचा कर थकीत आहे.

वाहन कर, पर्यावरण कर आदी थकीत कर वाहनांची तपासणी करण्यासाठी आरटीओ कार्यालयात वायूवेग पथके कार्यरत आहेत. या पथकांमार्फत कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या वाहनधारकांचा थकीत कर आहे त्यांना प्रथम नोटीसा पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यांची थेट घरी भेट देवून वाहने जप्त करण्यात येणार आहेत. त्यामुळे कर थकवलेल्या वाहनधारकांकडून तो वसूल करण्यासाठी कार्यवाहीचे काम प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत हाती घेण्यात आले आहे.