सह्याद्री कारखान्याची सभासदांना अन्यत्र विल्हेवाटची नोटीस, शेतकरी संघटनेचे साताऱ्यात आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने सभासदांना अन्यत्र विल्हेवाटची नोटीस पाठवली आहे. या नोटीसीनंतर शेतकरी संघटना व शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. या नोटीसीचा निषेध रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेने केला आहे. त्याचबरोबर ही नोटीस रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनही सुरू केले आहे.

याबाबत शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, कराड तालुक्यातील सह्याद्री साखर कारखान्याने सभासदांना अन्यत्र विल्हेवाट अशी नोटीस पाठविली आहे. कारखान्यास ऊस न दिल्यास, कारखान्याचे नुकसान झाल्यास भरपाई म्हणून दंड वसूल करण्यास तुम्ही पात्र आहात, अशी ही नोटीस पाठविण्यात आलेली आहे. याबाबत १५ दिवसांत उत्तर न दिल्यास कारवाई करण्यात येईल असेही स्पष्ट केलेले आहे. असे असलेतरी ५३ वर्षांत कारखान्याला सभासद दिसले नाहीत. कारखाना नफ्यात म्हणून कधीही एक रुपयाही बोनस दिला नाही.

मागील दोन वर्षांत तर डिस्टीलरी व मशीनरीचे काम सुरू असताना मोजक्या यंत्रणेवर कारखाना सुरू होता. त्यावेळेसही कारखान्याने तुम्ही ऊस कुठे घालता म्हणून शेतकरी आणि सभासदांची विचारपूस केली नाही. आता कारखान्याने सभासदांसाठी चुकीची नोटीस काढली आहे. कारखान्याने असे न करता नोंद करतील त्यांचा ऊस वेळेवर न नेल्यास कारखाना जबाबदार राहील.

दरम्यान, सभासदांना आलेली नोटीस रद्द करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनात शेतकरी संघटनेचे शेतकरी संघटनेचे कऱ्हाड उत्तर अध्यक्ष वसीम इनामदार, लक्ष्मण मोरे, सुहास पाटील, परबती तावरे, अमिर मुल्ला, सज्जन पवार, महिपती घाडगे, दस्तगीर इनामदार, युनूस इनामदार, दिलावर पटेल, जावेद इनामदार आदी सहभागी झाले आहेत.